गेली काही महिने वादग्रस्त ठरलेले सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची अखेर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी घेतलेला पंगा व पुत्राचा शाही विवाह त्यांना भोवला असल्याचे दिसून आले. तर नायकवडी यांनी आपले राष्ट्रवादीचे संबंध अगोदरच दुरावले असल्याचे स्पष्ट करुन जयंत पाटील यांच्या गुन्हेगारी टोळीशी संबंध ठेवण्यात रस नसल्याचे मत व्यक्त केले.
नायकवडी यांचा कारभार गेली काही महिने सतत वादग्रस्त ठरला होता. अशातच त्यांच्या पुत्राचा शाही विवाह राज्यभर गाजला होता. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या विरोधात लाट निर्माण झाली होती. सांगली शहर अध्यक्षपदावरून त्यांची अगोदरच हकालपट्टी केली होती. आता पक्षाचे सदस्यत्वही रद्द झाले असल्याने त्यांची पक्षातूनही हकालपट्टी झाली आहे, ही घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दिनकर पाटील यांनी केली. इद्रिस नायकवडी यांचे वडील इलियास नायकवडी हे पक्षाचे प्रदेश सचिव आहेत. त्यांचीही हकालपट्टी करण्यात यावी असा प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, महापौर नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असणारी राष्ट्रवादी काँग्रेस आता उरलेली नाही. सांगलीत जयंत पाटील यांची क्रिमिनल पार्टी कार्यरत आहे. पाटील यांच्या गुन्हेगारी टोळीमुळे पक्षाचे पूर्वीचे अस्तित्व राहिलेले नाही. मंत्री जयंत पाटील यांची महानगरपालिकेतील लुडबूड बंद केल्याचा राग आल्याने ही कारवाई केली. मी राष्ट्रवादीचा महापौर नाही तर स्वबळावर महापौर झालो असल्याचे त्यांनी नमूद केले. पुत्राचा शाही विवाह झाल्याचा आरोप त्यांनी नाकारला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2013 रोजी प्रकाशित
इद्रिस नायकवडी यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
गेली काही महिने वादग्रस्त ठरलेले सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची अखेर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी घेतलेला पंगा व पुत्राचा शाही विवाह त्यांना भोवला असल्याचे दिसून आले.
First published on: 03-03-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idris nayakwadi dismissed from ncp