Devendra Fadnavis On MNS : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून चांगलाच वाद सुरु आहे. यातच मुंबईतील मिरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यावरून झालेल्या वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मीरा रोड येथील एका मिठाईच्या दुकानात मराठी बोलण्यास नकार दिल्याने वाद झाला आणि यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत मोर्चा काढत आंदोलन केलं आहे.

तसेच मनसेने आपली भूमिका ठाम असल्याचं सांगितलं. मुंबईत मराठी आणि अमराठीवरून झालेल्या वादावरून मुंबई महापालिका निवडणुकीआधीच चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून भाजपा आणि मनसे आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळत आहे. यानंतर मनसेनेही मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या वादावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मनसेला मोठा इशारा दिला आहे.’मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर ते सहन केली जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल’, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“भाषेवरून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपली अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात. त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही. मग त्यांच्याशी पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर? भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी ही योग्य नाही. अशा प्रकारची गुंडगिरी कोणी केली तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“भाषेवरून कोणी मारहाण करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. ज्या प्रकारची घटना घडली आहे, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कारावाई केली आहे. यापुढेही अशा प्रकारे भाषेवरून कोणी वाद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. भारतातील कोणत्याही भाषेवर अशा प्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात. मग हा कोणता विचार आहे? त्यामुळे अशा प्रकारे जे लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आम्ही कोणाचाही दबाव मान्य करणार नाही’

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नक्कीच मेळावा घ्यावा, आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना आनंद झालेला दिसत आहे. मात्र, त्या पाठिमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. एक समिती तयार करणे, त्या समितीत आपल्या एका नेत्याचा समावेश करणे, पहिलीपासून ते १२ वी पर्यंत हिंदीची सक्ती करणे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणारे तेच, निर्णयावर सही करणारेही तेच आणि आता विजयी मेळावा घेणारेही तेच. मला असं वाटतं की मराठी माणसांना हे लक्षात येतं की कोण दुटप्पी आहे. मात्र, आमचा विषय पक्का आहे. आम्ही समिती केली आहे, जे मराठी मुलांच्या हिताचं असेल ते आम्ही मान्य करू, आम्ही कोणाचाही दबाव मान्य करणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.