Devendra Fadnavis On Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. अनेक नेत्यांचे विविध शहरांत दौरे सुरू असून नेते आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून पक्ष संघटनेचा आढाव घेत आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी एक महत्वाचं विधान केल्याची चर्चा आहे.

‘मुंबईत मनसे आणि शिवसेना (ठाकरे) व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांची जास्त ताकद नाही’, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं असल्याचं माध्यमांत वृत्त आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष टीका केली आहे. ‘कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये मला काही हरकत घेण्याचं कारण नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज ठाकरे एका मेळाव्यात बोलताना असं म्हणाले की, मुंबईत फक्त दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्षच मजबूत आहेत. दुसऱ्या पक्षांची मुंबईत जास्त ताकद नाही. त्यांच्या या विधानाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही मुंबईत सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“पण कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला त्यामध्ये काहीही हरकत घेण्याचं कारण नाही. प्रत्येकाला आपल्या पक्षाला मोठं म्हणण्याचा अधिकार आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली आहे.

‘कबुतरखान्यावरील बंदी योग्यच’ : राज ठाकरे

“कबुतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैन मुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे, तर त्याप्रकारे ती गोष्ट झाली पाहिजे”, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात, याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर कुणी खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर खायला टाकत असाल तर ते चुकीचे आहे.”

मांस विक्री बंदीवरही केली टीका

१५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयावरही राज ठाकरे यांनी टीका केली. “आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या गोष्टीचे अधिकार नाहीत. कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये? हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत”, असे राज ठाकरे म्हणाले.