ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात ४२ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नाना पाटेकरांनी मोठं विधान केलं आहे. जे तुम्हाला जाती-धर्मांमध्ये अडकवतात, ते समाजातील सर्वात मोठे गुंड आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले, “तुम्ही विद्यार्थ्यांनी…, मी जात आणि धर्म पाळणार नाही, अशी शपथ घ्यायला हवी. जात आणि धर्म पाळण्याऐवजी एकमेकांना दिलेला शब्द पाळला तर जगणं सोपं होईल. मी तुझ्यापेक्षा लहान किंवा मी तुझ्यापेक्षा मोठा… हा विचार जोपर्यंत तुमच्या मनातून जात नाही, तोपर्यंत तुम्ही खरंच पुढे जाणार नाहीत. हे सगळं ट्रेडमीलवर धावण्यासारखं आहे. तुम्ही तिथल्या तिथे पळत राहाल. हे कायम लक्षात ठेवा.
हेही वाचा- VIDEO: ….अन् रिक्षालाचकाने तरुणीला रस्त्यावरुन फरफटत नेलं, ठाण्यातील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
जर तुम्हाला कुणी जात आणि धर्मामध्ये अडकवत असेल तर ते समाजतले सगळ्यात मोठे गुंड आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. देशातील प्रत्येक जातीनं, प्रत्येक धर्मानं आपला देश पुढे जाण्यासाठी काम केलं आहे, त्यामुळे सर्वांचा आदर करा, असं विधान नाना पाटेकरांनी केलं आहे.
हेही वाचा- “…तर कानाखाली आवाज काढेन”, संतोष बांगरांचा कृषी कार्यालयात पुन्हा राडा; अधिकाऱ्यांनाही केली शिवीगाळ
तुम्ही चित्रपटातील भूमिकांमधून अन्याय अत्याचारावर प्रहार करता, वास्तव मांडता, बोलता. पण प्रत्यक्ष आम्ही तसा प्रयत्न केला तर लोक अंगावर येतात? असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला असता, नाना पाटेकर म्हणाले, खरं बोलायचं असेल तर परिणामांची काळजी करू नका. मरणाची भीती जर का मनातून एकदा गेली तेव्हा माणसाला कशाचीही भीती वाटत नाही. हे लक्षात घ्या.