महाराष्ट्रात जर सगळ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली आणि योग्य ते सगळे नियम पाळले तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउनची गरज भासणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. देशातल्या अनेक भागांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप तरी लाट आलेली नाही. ती टाळायची असेल तर सगळ्यांनी काटेकोरपणे नियमांचं पालन करणं आवश्यक आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

एकीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांच्या हलगर्जीपणावर भाष्य केलं आहे. लोक करोनाबाबत सरकारने आखून दिलेल्या गाइडलाइन पाळत नाहीत असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे का? अशी चर्चा सुरु असतानाच जर सगळ्यांनी काटेकोर नियम पाळले तर लॉकडाउनची गरज भासणार नाही असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.