मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुरी (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. जमावाकडून थेट परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर या घटनेची अत्यंत गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. कॉपीचे आणि पेपर फुटीचे हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटोळे होईल, अशी भीती व्यक्त करत सरकारने गांभीर्याने या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

खरं तर सामूहिक कॉपीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी मानुर येथे दहावीचे परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार घडला. कॉपी पुरविणाऱ्या जामावाकडून भरारी पथकावर लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांची राजकीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. बुधवार १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टाकळी-मानुरी (ता. पाथर्डी) येथे दहावीचा भूमिताचा पेपर सुरू होता. त्यावेळी परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाने परीक्षा केंद्रात जबरदस्ती प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी याला नकार देताच जमावाने त्यांच्यावर हल्ला केला, शिवाय दगडफेक केली.

पाथर्डीतील या घटनेबरोबरच जालन्यात परीक्षेदरम्यान जिल्हा परिषद शाळा, सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारू, अशा धमक्याच केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांना देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी सामूहिक कॉपी, पेपरफुटीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार घडल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. राज्याची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. तरी या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन या विरोधात कडक भूमिका घ्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.