कोयना धरणातून पाणी सोडताना आणि पुढे अलमट्टी धरणातून विसर्ग करण्याविषयी दोन्ही प्रशासनामध्ये योग्य समन्वयाची आवश्यकता होती. मात्र त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची योग्य पावलं उचलली गेली नाही. जर योग्य संवाद झाला असता, तर पूर आला नसता अशी भावना सांगली येथील पुराचा फटका बसलेले नितीन अर्जुन जाधव यांनी व्यक्त केली. तसेच या पुढील काळात प्रशासनाने योग्य समन्वय ठेवावा अशी अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
सांगली आणि कोल्हापूर या भागाला आलेल्या पुरामुळे लाखो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे अनेक नागरिकांना आसपासच्या शाळा,
महाविद्यालयामध्ये रहावे लागते आहे. मात्र रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे. अनेक नागरिकांच्या घरातील पाणी हळूहळू ओसरु लागले आहे. त्यामुळे नागरिक घरी परतून आपल्या घरांची अवस्था काय झाली ते पहात आहेत.
याच पुराचा फटका सांगली बस स्थानकाच्या मागच्या भागातही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तेथील नितीन अर्जुन जाधव म्हणाले की, सांगलीमध्ये अशाच स्वरूपाचा पूर २००५ मध्ये देखील आला होता. मात्र त्यावेळी पाण्याची पातळी कमी होती. पण यंदा मागील आठवड्यात सुरुवातील ३ फुटांवर पाणी असलेले काही तासात १५ फुटांवर पोहोचले. हे पाणी आठ दिवस आमच्या परिसरात होते आणि रविवारी रात्रीच्या सुमारास पाणी पातळी कमी झाली. त्यानंतर घरी आल्यावर पाहतो. तर फक्त चिखल आणि चिखलच दिसत होता. यामुळे घरातील सर्व साहित्य पाण्यात खराब झाले. आता आमच्याकडे अवघी दहा ते पंधरा भांडी शिल्लक राहिली आहेत हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.
तर ते पुढे म्हणाले की, कोयना आणि अलमट्टी धरणाच्या प्रशासनाचा समन्वय योग्य केला असता. तर अशी घटना झाली नसती. आता या पुढील काळात प्रशासनाने समन्वय ठेवावा. तसेच ज्यावेळी सांगली परिसरात पाण्याची पातळी वाढत होती. तेव्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे आमच खूप मोठ नुकसान झाले असल्याचे सांगत प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.