गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यात नवी समीकरणे तयार होताना दिसत आहेत. आता शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गट राजकारणासाठी नवे पर्याय शोधत असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटातील ३८ आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरु आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माध्यमांशी बोलातना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशीही या मुद्द्यावर फोनवर चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल्याचे बोलले जात असले तरी, यामागचे खरे कारण शिंदे गटाला मनसेत प्रवेश करून राज्यातील राजकारणाची नवी समीकरणे निर्माण करायची असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोन वेळा फोन; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

“बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी फोन केला. रविवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटं प्रकृतीसंदर्भातील चर्चा झाली. राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचं त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचे समजते. या फोन कॉलदरम्यान शिंदे यांनी राज ठाकरेंना राजकीय घडामोडींसंदर्भातील माहिती देताना आपली बाजूही सांगितल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय.