राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, ही मुदत संपायला आता काहीच दिवस उरलेत. त्यामुळे नोंदणी कार्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे; मात्र आता याच महिन्यात, म्हणजे ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत दस्तनोंदणी प्रक्रिया पूर्ण करीत सध्या सुरू असलेल्या तीन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे. याबाबतचे आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुटीच्या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू :-

दस्त नोंदणीचे प्रमाण वाढल्याने सुटीच्या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी शनिवार, तर २५ डिसेंबरला नाताळची सुटी आहे. मात्र, या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत. याबरोबरच पुणे, मुंबई आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये दस्त नोंदणीच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणची दस्त नोंदणी कार्यालये सकाळी ७.३० ते रात्री ८.४५ पर्यंत दोन सत्रांत सुरू ठेवण्यात आली आहेत. दरम्यान,  ‘मुद्रांक शुल्क कमी करण्यात आल्याने दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. मुद्रांक शुल्क भरल्यानंतर संबंधितांना पुढील चार महिन्यांत दस्त नोंदणी करता येणार आहे. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.’ असे नोंदणी महानिरीक्षक देशमुख म्हणाले.

आतापर्यंत शहरी भागात दस्त नोंदणी करताना पाच टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्के  नागरी कर असे सहा टक्के  मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. ग्रामीण भागात चार टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का जिल्हा परिषद अधिभार (सेस) असे पाच टक्के  मुद्रांक शुल्क नागरिकांना द्यावे लागत होते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३१ डिसेंबपर्यंत शहरी भागासाठी दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का नागरी कर असे तीन टक्के  मुद्रांक शुल्क द्यावे लागत आहे. ग्रामीण भागासाठी एक टक्के  मुद्रांक शुल्क आणि एक टक्का जिल्हा परिषद अधिभार असे दोन टक्के  मुद्रांक शुल्क द्यावे लागत आहे. ’१ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत शहरी भागात तीन टक्के  मुद्रांक शुल्क आणि एक टक्का नागरी कर असे चार टक्के , तर ग्रामीण भागात दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्के  जिल्हा परिषद अधिभार असे तीन टक्के  मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If registered before 31st december get stamp discount for next four months sas
First published on: 21-12-2020 at 10:10 IST