Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Stale Food Row: आमदार निवासातील कँटिनमधून शिळे अन्न दिल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाणाची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विधिमंडळात माध्यमांशी बोलत असताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “जर कुणी मला विष चारत असेल तर मी त्याची पूजा करायची का? बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हे शिकवले नाही. आमच्यावर अन्याय झाल्यास त्याविरोधात पेटून उठण्याची शिकवण त्यांनी दिली होती.” तसेच या प्रकरणी विधानपरिषदेत चर्चा झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली.
आमदार संजय गायकवाड एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, मी आकाशवाणी आमदार निवासातील कँटिन चालकांना वारंवार विनंती केली होती की, त्यांनी जेवणाचा दर्जा सुधारावा. मात्र तरीही काहीच सुधारणा झाली नाही. मी ३० वर्षांपासून आकाशवाणी कँटिनमध्ये येत आहे. ५.५ वर्षांपासून इथे राहत आहे. जेवणाचा दर्जा सुधारा, असे मी अनेकदा सांगितले होते. येथील अंडी १५ दिवसांपूर्वीची आहेत, मांस १५ ते २० दिवसांपासून शिळे आहे, भाज्याही जुन्या असतात. इथे रोज पाच ते दहा हजार लोक जेवतात. सर्वांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत.”
शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या मारहाणीबद्दल संजय गायकवाड यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना गायकवाड म्हणाले, “उबाठाच्या खासदाराने १० वर्षांपूर्वी दिल्लीत काय केले होते. त्यांना कँटिनमध्ये निकृष्ट जेवण दिल्यानंतर उबाठाच्या खासदारांनी कँटिन चालकाच्या तोंडात चपाती कोंबली होती. तेव्हा संजय राऊत कुठे गेले होते? एवढेच नाही तर त्या कर्मचाऱ्याचा रोजानिमित्त उपवास होता. तोदेखील त्यांनी तोडला. मी तर असे काही केले नाही.”
संजय गायकवाड पुढे म्हणाले, यापूर्वी कँटिनमधील जेवणात पाली, उंदीर आणि दोऱ्या आढळल्या आहेत. तसेच आमदाराच अशाप्रकारचे शिळे अन्न मिळत असेल तर विचार करा, सामान्य माणसांना किती निकृष्ट पद्धतीचे जेवण दिले जात असेल? असाही प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटले?
दरम्यान या घटनेचे पडसाद विधीमंडळातही उमटले. विधानपरिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ पाहिला. अशाप्रकारचे वर्तन विधीमंडळ सदस्यास भूषवाह असे नाही. यामुळे विधीमंडळाची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होत आहे. आमदार निवासात सोयी-सुविधा नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशावेळी तक्रार करावी. पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे चुकीचे आहे. तसेच विधीमंडळ अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.”