आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य

जालना : राज्यात ७० ते ८० टक्के जनतेचे लसीकरण झाले तर ते करोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेले बरेचसे निर्बंध कमी करण्यासाठी अनुकूल ठरेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, लसीकरणाच्या संदर्भात जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या केंद्रावर लशीच्या १५०-२०० मात्र उपलब्ध असल्या, तरी त्यासाठी त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांच्या रांगा लागतात. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेऊन राज्यास लशींच्या अधिक मात्रा उपलब्ध करवून देण्याची विनंती आपण करणार आहोत.

रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा इत्यादी करोनाबाधितांचा दर अधिक असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये पुरामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या जिल्ह्य़ातील करोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात संबंधित आरोग्य यंत्रणेस सूचना देण्यात आल्या आहेत. या भागातील दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाच्या वतीने या भागातील जनतेस र्निजतुक पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

पूरग्रस्त गावांमध्ये डायरिया, टायफाइड किंवा अन्य साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आरोग्य विभाग आवश्यक ती काळजी घेत आहे. पूरग्रस्त भागात तत्काळ  उपचार करतानाच त्यांना मानसिकदृष्टय़ा सावरण्याचीही आवश्यकता आहे. पूरपरिस्थितीमुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप करण्याची सूचना आरोग्य यंत्रणेला करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी पूरग्रस्त भागास भेटी देऊन पाहणी केली आहे. तीन दिवसांनंतर आपण या भागास भेट देणार असून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला

गेल्या महिना-दीड महिन्यांत ज्या जिल्ह्य़ात करोना संसर्गाचे प्रमाण एक टक्क्य़ाच्या आत असेल तेथील निर्बंध काही प्रमाणावर शिथिल करता येतील का याचा विचार सुरू आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या करोना कृती दलाकडून अहवाल मागितला आहे. येत्या दोन दिवसांत अहवाल सादर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

९६ टक्के रुग्ण करोनामुक्त

सोमवापर्यंत राज्यात जवळपास चार कोटी ७० लाख करोना चाचण्या झाल्या. या प्रयोगशाळा चाचण्यांपैकी ६२ लाख ६९ हजार ७९९ म्हणजे १३ टक्क्य़ांपेक्षा अधिक नमुने करोनाबाधित निघाले. ६० लाखांपेक्षा अधिक म्हणजे ९६.४३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यात चार कोटींपेक्षा अधिक लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या एक कोटींपेक्षा अधिक झाली आहे.