मागील एक आठवड्यापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून ते ४० हून अधिक शिवसेना आणि अपक्ष आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटी याठिकाणी गेले आहेत. पण आसाममध्ये सध्या पूरस्थिती आहे. ३५ पैकी ३२ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून जवळपास ५५ लाख नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना खोचक टोला लगावला आहे.

सध्याच्या राजकीय स्थितीबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन आपण सर्वांनी ऐकलं असेलच. माझं अजूनही एवढंच मत आहे की, जे कुणी तिकडे गुवाहाटीत आहेत. माझी हीच अपेक्षा असेल ते खरोखर शिवसैनिक असतील तर त्यांनी गुवाहाटीत आजुबाजूला पूर आलेल्या स्थळी जावं आणि लोकांची सेवा करावी. एकीकडे आसाममध्ये पूर आला असताना, कोण एवढं मजा करायला लावतंय, मला माहीत नाही,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा माघारी येण्याचं आवाहन केलं आहे. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असं उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले…
“आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.