माझे वडील ते (एकनाथ शिंदे) चोरत आहेत असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर त्यांना आता शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर म्हणाले की, वडिलांची चोरी झालीय असं ते म्हणत असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात जावं. पोलिसात जाऊन तक्रार करावी आणि एफआयआर नोंदवावा.
पावसकर म्हणाले की, लाखो लोकांनी बाळासाहेंब ठाकरेंवर प्रेम केलं. त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षासाठी काम केलं आहे. त्यांच्यावर फक्त उद्धव ठाकरेंचाच अधिकार राहत नाही. बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्वजण इकडे (शिवसेना – शिंदे गट) आले आहेत. ते फक्त माझ्या वडिलांचं नाव, माझ्या वडिलांच नाव असं करत आहेत. पण ते फक्त तुमच्या एकट्याचे वडील नाहीत. बाळासाहेब हे जयदेव ठाकरे आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे देखील वडील आहेत. बिंदू माधव ठाकरेंचा मुलगा शिवसेनेसाठी काम करतोय. चिन्ह मिळावं, शिवसेना हे नाव मिळावं यासाठी कोर्टात प्रयत्न करत आहे.
हे ही वाचा >> महिला IAS-IPS अधिकाऱ्यांमधला वाद चव्हाट्यावर, आधी खासगी फोटो शेअर केले आता भ्रष्टाचाराचे आरोप
“लोक यांना वेडा म्हणू लागतील…”
पावसकर एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही, राज्यपालांना हाकला, निवडणूक आयुक्तांना हाकला असं म्हणत आहेत. थोड्या दिवसांनी लोक यांना वेडा म्हणू लागतील. खरंतर, आम्ही जे काही करत आहोत ते केवळ बाळासाहेबांवरील प्रेमापोटी करत आहोत. त्यांनी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवावा. त्यांचा जो काही निर्णय असेल तो त्यांना आणि आम्हाला देखील मान्य असला पाहिजे.”