मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येस दीड महिना होऊनही प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आलेला नाही. आयआयटी मुंबईतील विद्यार्थी संघटनांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दर्शनच्या आत्महत्येसंदर्भात प्राथमिक माहिती अहवाल नोंदविण्याची मागणी केली आहे. विशेष तपास पथकाने सूचना देऊनही स्थानिक पोलिसांनी अहवाल नोंदवला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
हेही वाचा >>> “महाराष्ट्रात लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच”, राज ठाकरेंचा हल्लाबोल!
दर्शन याने १२ फेब्रुवारी रोजी वसतीगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या तपासासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. मात्र या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अद्याप प्रथम माहिती अहवाल नोंदवलेला नाही. याबाबत आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल, आंबेडकराइट स्टुडंट्स कलेक्टिव आणि आयआयटी मुंबईच्या काही माजी विद्यार्थ्यांनी फडणवीस यांना पत्र लिहून एफआयआर नोंदवण्याची सूचना देण्याची विनंती केली आहे.
दर्शनचे पालक १६ मार्च रोजी प्राथमिक माहिती अहवाल नोंदविण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांनी व वकिलांनी वारंवार विनंती करूनही पवई पोलीस ठाणे, विशेष तपास पथक आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो नोंदविण्यास नकार दिला, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.
हेही वाचा >>> सलमान खानला दिलेल्या धमकीचे धागेदोरे ब्रिटनपर्यंत; धमकी पाठवलेले ईमेल खाते ब्रिटन क्रमांकाद्वारे उघडले
दर्शनबाबत आयआयटीत भेदभाव झाला. काही अनुचित अनुभवांमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले, असा दावा दर्शनच्या कुटुंबाने केला होता. पण आयआयटी मुंबईने स्थापन केलेल्या चौकशी समितीने जातीवर आधारित भेदभाव झाल्याचे नाकारून शैक्षणिक अधोगती हे आत्महत्येचे संभाव्य कारण असल्याचे नमूद केले आहे. दर्शन हा मूळचा गुजरातच्या अहमदाबादमधील होता. तो आयआयटी मुंबईमध्ये बी टेक (केमिकल) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.