सावंतवाडी: कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध सिलिका उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे परिसराचे मोठे नुकसान होत आहे. तसेच खोटे पास तयार करून या सिलिकाची वाहतूक केली जात आहे.

प्रत्यक्षात ३०० हेक्टरमध्ये उत्खननाची परवानगी असताना दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात उत्खनन करून संपूर्ण कासार्डे परिसर भकास केला जात आहे. या अवैध उत्खननाला राजकीय वरदहस्त आणि जिल्हा प्रशासनाची डोळेझाक असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, विधानसभा संघटक सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे.

कासार्डे भागात नवा बीड पॅटर्न तयार होत असून, भविष्यात येथे हाणामारी आणि खुनासारख्या घटना घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या अवैध उत्खननामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महसूल प्रशासनावर लाचखोरीचा आरोप

कणकवली येथील विजय भवनमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी परशुराम उपरकर यांनी ट्रेडिंगच्या नावाखाली अवैध सिलिका उत्खनन होत असून, महसूल प्रशासनाला दरमहा दोन ते अडीच कोटी रुपयांची लाच दिली जात असल्याचा आरोप केला. सन २०११ मध्ये या अवैध उत्खननाची तक्रार केल्यानंतर एका व्यावसायिकाला तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, महसूल प्रशासनाने अद्याप त्याची वसुली केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिकांना दमदाटी आणि आमिषांचा आरोप

सतीश सावंत यांनी कासार्डेतील स्थानिकांना दमदाटी आणि आमिषे दाखवून त्यांच्या जमिनीतील सिलिका उत्खनन केले जात असल्याचा आरोप केला. दोन दिवसांपूर्वी कासार्डेत कदम नावाच्या एका महिलेच्या जमिनीमध्ये अवैध उत्खनन सुरू करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी

वैभव नाईक आणि राजन तेली यांनी कासार्डेतील सिलिका उत्खननामागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्यांनी थोडी माती काढली तरी महसूल प्रशासन कारवाई करते, मात्र कासार्डेत दररोज हजारो टन सिलिका उत्खनन आणि वाहतूक होत आहे, असा आरोप त्यांनी केला.