भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) समितीने तब्बल २४ त्रुटी काढून चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नामंजूर केले आहे. याबाबतची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भातील अंतिम निर्णय १५ दिवसांत जाहीर होणार असून २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.

चंद्रपुरात शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने मंजुरी दिली होती. मात्र, निकषाप्रमाणे आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली नाही. राज्यात युतीची सत्ता येताच २०१५-१६ या सत्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न होते. त्यासाठी अर्थमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व शक्ती एकवटली. महाविद्यालयाची प्रस्तावित इमारत होईपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय व जुने क्षय रुग्णालय परिसरातील स्वतंत्र महिला रुग्णालयात हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.
एमसीआयच्या समितीने केलेल्या तपासणीत अनेक त्रुटी आढळल्याने महाविद्यालय नामंजूर करण्यात आले. नामंजुरीची शिफारस ही एमसीआयच्या कार्यवाहीची बाब आहे. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय येत्या १५ दिवसांत होईल. या सत्रापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे सर्वथा आरोग्य मंत्रालयावरच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे रुग्णालय अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी स्पष्ट केले.

आढळलेल्या त्रुटी
*रुग्णांच्या खाटांची संख्या ३०० पेक्षा कमी
*आवश्यक फर्निचर, प्रयोगशाळा, नियमित तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदभरती नसणे
*प्राध्यापक नसणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.