अहिल्यानगर : जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीच्या १५० गुणांची अंतिम प्रभाग रचना आज, शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केली. प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवर सुनावणी होऊन गट व गणांची हद्द निश्चित करण्यात आली. त्यानुसार गट व गणांच्या नकाशासह अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

आता सर्वांचे लक्ष गट-गणांच्या आरक्षणाकडे लागले आहे. काही दिवसांत गट-गणांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, प्रारूप प्रभाग रचना अंतिम करतांना हरकतीनुसार कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदा व जामखेड तालुक्यातील गट आणि पंचायत समितीच्या गणांतील काही गावांमध्ये बदल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता प्रभाग रचना अंतिम झाल्याने निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या धर्तीवर आरक्षण सोडती काढण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी आधी प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण, त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अशी प्रक्रिया राहणार आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक रखडलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १४ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. या प्रारूप प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत एकूण ९२ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. सुनावणीत ९२ पैकी २३ हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या.

सन २०११ च्या लोकसंख्येच्या आधारवर प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत. कर्जत आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. आता गट आणि गणांचे राजकीय आरक्षण कसे असणार, त्यात काय बदल होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सर्वाधिक लोकसंख्या भातकुडगाव गटाची

सन २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर गट व गणांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. सर्वाधिक लोकसंख्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव गटाची ५६ हजार १०६, तर सर्वांत कमी लोकसंख्या जामखेड तालुक्यातील साकत गटाची ३७ हजार २९८ आहे. जिल्हा परिषदेच्या ७५ गटांपैकी २२ गटांमधील लोकसंख्या ही ५० हजारांच्या पुढे, तर उर्वरित गटांमध्ये लोकसंख्या ४० ते ४९ हजार दरम्यान आहे.

३६ लाख ४ हजार ६६८ लोकसंख्या

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली असून, त्यानुसार ७५ गटांमध्ये ३६ लाख ४ हजार ६६८ लोकसंख्या असून, त्यात अनुसूचित जातीची ४ लाख ४५ हजार ५९५, तर अनुसूचित जमातीची ३ लाख ५७ हजार ४१३ लोकसंख्या आहे.