अहिल्यानगर : प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अधिकृत कार्यभार नसताना शिर्डी उर्दू एज्युकेशन सोसायटी संचालित इकरा उर्दू स्कूल शाळेच्या चार शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली. तसेच कायमस्वरुपी सरकारी नोकरी लावण्यासाठी स्वतःच्या स्वाक्षरीने आदेश देऊन, खोटा जावक क्रमांक टाकून, बनावट दस्तऐवज तयार करून चार शिक्षकांसह शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघे मृत झाले आहेत.

यासंदर्भात प्रभारी उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विलास अशोक साठे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, तत्कालीन वरिष्ठ सहायक जे. के. वाघ (मृत) व तत्कालीन संस्था सचिव रज्जाक अहमद शेख (मृत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १६ डिसेंबर २०१३ ते २२ ऑगस्ट २०१४ या कालावधीत ही घटना घडली.

फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीतील इकरा उर्दू स्कूल (पूनमनगर, शिर्डी ता. राहाता) येथील शाळेतील श्रीमती खान जरीन मुख्तार, सय्यद समिना शब्बीर, शेख आस्मा रज्जाक व शेख नियाजउद्दीन सल्लाउद्दीन यांच्या वैयक्तिक आदेशामध्ये त्रुटी असल्याने त्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी व कायद्यानुसार फिर्याद द्यावी, असे आदेश सध्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिले होते. त्यासाठी राजश्री मधुकर घोडके (उप शिक्षणाधिकारी, जि.प.) यांच्या अध्यक्षतेखाली मिना शिवगुंडे (उप शिक्षणाधिकारी, प्राथमिक), हेमलता गलांडे (अधीक्षक), राधाकिसन शिंदे (शिक्षण विस्तार अधिकारी) यांचा समावेश असलेली चौकशी समिती नियुक्त केली होती.

समितीने प्राथमिक शिक्षक व सहशिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता अनियमिततेबाबत चौकशी करून अहवाल सादर केला. शाळेमधील चार शिक्षक कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक मान्यता प्रस्ताव संस्थेचे तत्कालीन सचिव रज्जाक अहमद शेख यांनी समक्ष सादर केला. प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयात संबंधित शिक्षकांचे मान्यता संचिका व आदेशाच्या स्थळप्रती उपलब्ध नाहीत. जावक कार्यासनामार्फत मान्यता आदेश वितरित केले नाहीत. चारही वैयक्तिक मान्यता प्रस्ताव २०१६ मध्ये इकरा उर्दू स्कूल या शाळेने सादर केलेले आहे.

सदर प्रस्तावाचा बटवडा तत्कालीन लिपिक शेख सलीम यांनी केलेला नाही. त्यानुसार २०१६ पर्यंत सदर शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आलेली नव्हती. तसेच, २०१४ मधील आवक-जावक नोंद विहीत शिक्षकांच्या मान्यता आदेशाच्या अनुक्रमांकास इतर संदर्भाची नोंद आढळून आली. चार शिक्षकांच्या सन २०१४ मध्ये वैयक्तिक मान्यता देताना कार्यालयीन कार्यपद्धतीचा अवलंब न करता तत्कालीन संस्था सचिव रज्जाक अहमद शेख (मृत) यांनी थेट प्रस्ताव सादर केला. तत्कालीन प्रभारी अधिकारी सुलोचना पटारे व जे. के. वाघ यांनी सदर शिक्षकांना थेट मान्यता दिल्याचे चौकशीमध्ये आढळले.

तसेच ५ ऑगस्ट २०१४ रोजी वैयक्तिक मान्यता देताना शिक्षणाधिकारी म्हणून सुलोचना पटारे यांच्याकडे अधिकृत पदभार नव्हता. तरीही त्यांनी चार शिक्षकांना कार्यालयीन कार्यपद्धतीचा अवलंब न करता वैयक्तिक दिल्याचे चौकशीत उघड झाले.