अहिल्यानगर: महापालिकेच्या आगामी निवडणुकांचे वेध लागल्याने शहरात विरोधकांना धमकावण्याचे प्रकार शहरात सुरू झाले आहेत. अशाच प्रकारे संभाव्य विरोधकाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावले तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याला जखमी केल्याची घटना शहरातील बाबा बंगाली भागातील नाझसाब चौकात घडली. यासंदर्भात माजी नगरसेवकासह त्याच्या टोळीतील ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात ही टोळी ‘रशीद दंडा’ या नावाने कुप्रसिद्ध आहे. मारहाणीत अबुताला अकिल शेख (रा. इब्राहिम कॉलनी चौक) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिलेले फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी माजी नगरसेवक व त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती तपासी अधिकारी तथा कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
‘हमारे खिलाफ खडा हुआ तो जान से मार देंगे’, अशी धमकी देत हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरडाओरडा झाल्यानंतर हल्ला करणारे सर्वजण मोटरसायकलवरून पसार झाले. रशीद दंडा टोळीविरुद्ध इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती कोतवाली पोलिसांकडून देण्यात आली.
शहरात महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागले आहेत. इच्छुक व राजकीय पक्षांच्याही त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने प्रभाग रचनाचे प्रारूप तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. येत्या ३ सप्टेंबरला प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. ही प्रारूप प्रभाग रचना कशी असेल याकडे इच्छुक लक्ष ठेवून आहेत. महापालिका निवडणुकीचे सावट आजच्या दहीहंडी उत्सवावर पडले आहे. राजकीय नेत्यांचे फलक या उत्सवात झळकले आहेत. काही ठिकाणी प्रक्षेपक फलकही लागले आहेत.
आगामी गणेशोत्सवातही मनपा निवडणुकीच्या इर्षेतून राजकीय शक्तीप्रदर्शनाचे झलक नगरकरांना पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिवाळीनंतर, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याचे भाकीत केले आहे. शहरातही निवडणुकीची पूर्वतयारी इच्छुक उमेदवारांनी सुरू केली आहे. त्यातूनच संभाव्य उमेदवारावर हल्ला करण्याची घटना घडल्याचे सांगितले जाते. यापूर्वी महापालिका पोटनिवडणूक वादातून केडगाव उपनगरात शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची भरदिवसा व भररस्त्यात कोयत्याने हल्ला करून खून केल्याची घटना राज्यभर गाजली होती. या घटनेत एक आमदार, एक माजी आमदार व नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.