अलिबाग – अलिबाग तालुक्‍यातील पांडवादेवी येथे आदिवासी जोडप्‍यांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजीत करण्‍यात आला होता. या कार्यक्रमात 1 हजार आदिवासी जोडपी विवाह बंधनात अडकले. मुलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्‍थेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

आदिवासी समाजाला मुळ प्रवाहात आणण्‍यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. परंतु शासनाच्‍या या उपक्रमाला हातभार लावण्‍यासाठी मुलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्‍थेने पुढाकार घेतला आहे. त्‍यांच्‍या या उपक्रमाला आदिम उन्‍नत सेवा संघ तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला हरिव्‍दार येथील डॉ. भगवती नंदा आखाडयाच्‍या महामंडलेश्‍वर उपस्थित होत्‍या. त्‍यानी या उपक्रमाचे कौतुक केले. आदिवासी जोडप्‍यांचा सामुहिक विवाह सोहळा प्रेरणादायी आहे.

विवाह सोहळयावर होणारे खर्च कमी करून संस्‍थेने हा उपक्रम राबवला अशा प्रकारचे उपक्रम समाजात राबवणे गरजेचे असून त्‍याला समाजाच्‍या वेगवेगळया स्‍तरातून सहकार्य मिळाले पाहिजे. आदिवासी विकास विभागाने अशा उपक्रमाला प्रोत्‍साहन द्यायला हवे त्‍याच बरोबर शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायला हवा. आदिवासी समाजातील तरूणांना आदिवासींसाठी शासनाच्‍या योजना समजावून सांगितल्‍या पाहिजेत जेणेकरून या समाजाला आपली प्रगती साधणे सहज शक्‍य होईल असे त्‍यांनी सांगितले.

संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष ईश्‍वर नाईक यांनी सांगितले की हा उपक्रम राबवण्‍यासाठी आम्‍ही मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. समाजातील विविध स्‍तरातून मिळालेल्‍या सहकार्यामुळे आम्‍ही हा उपक्रम यशस्‍वी करू शकलो. संपूर्ण जिल्‍ह्यातून 1 हजार आदिवासी जोडप्‍यांची निवड करून आम्‍ही त्‍यांना एकत्र आणणे हे मोठे काम होते. परंतु संस्‍थेच्‍या सदस्‍यांनी मेहनत घेवून हे काम केल्‍याचे नाईक यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाला जुनागडचे हनुमानदास महाराज, काजशीमहाराज वाघुल, एकनाथ महाराज पवार, हेमंत गिरीमहाराज , पद्माकर महाराज म्‍हात्रे आदि साधू महंतांनी आवर्जून उपस्थिती लावत नवविवाहीत जोडप्‍यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍पाचे आनंद पाटील, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अलिबाग विधानसभा मतदार संघाचे अध्‍यक्ष अमित नाईक, भाजपाचे अॅड. आस्‍वाद पाटील, रायगड जिल्‍हा आदिवासी कातकरी समाज संघटनेचे संतोष वाघमारे, केतन वाघमारे, संखाराम पवार, दिलीप कदम, नारायण लोभी, कांता वाघमारे, महेश वाघमारे उपस्थित होते.