डहाणू : पालघर जिल्ह्यातील पेसा शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्यामुळे शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या एका पत्रानुसार भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेसा शिक्षक भरती साठीपात्र असलेल्या ८३५ उमेदवारांपैकी ७७८ उमेदवारांना तालुका स्तरावर विषयाप्रमाणे शाळा स्तरावर निश्चिती करण्यात आली आहे. मात्र एका सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून येथे १० नोव्हेंबर पर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये हातातोंडाशी आलेल्या नोकरीला मुकावे लागेल अशी भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : देशात दहा महिन्यांत १५० हून अधिक वाघांचा मृत्यू; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण

भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यातील अनेक शिक्षक भरती उमेदवार पोलीस भरती तयारी, होमगार्ड, आश्रमशाळेत तासिका शिक्षक तसेच खाजगी क्षेत्र आणि कंपनीमध्ये नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र भरती प्रक्रियेत पात्र ठरून शाळा निश्चिती झाल्यामुळे त्यांनी नवीन नोकरीच्या आशेवर आपल्या हातातील कामे सोडली. त्यातच भरती प्रक्रियेवर स्थगिती आल्यामुळे उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : “मी स्वत:वरही गोळी झाडू का?” चौघांचा खून केल्यानंतर चेतन सिंह चौधरींचा पत्नीला फोन, आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती प्रक्रिया स्थगितीमुळे एका उमेदवार तरुणीचा नैराश्याने मृत्यू झाल्याची घटना जव्हारमधून समोर आली आहे. याआधी २०१४ साली तलाठी भरती प्रक्रियेत मेरिटमध्ये आलेली ताई गणपत गभाले ही तरुणी शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र ठरली असून तिला तालुका स्तरावरून शाळा निश्चिती देण्यात आली होती. मात्र भरतीवर स्थगिती आल्यामुळे ताई गभालेला नैराश्याने घेरले असून त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या प्रकरणी परिसरातून हळहळ व्यक्त होत असून पेसा भरतीचा पहिला बळी या मथळ्याखाली तिचा फोटो प्रसार माध्यमांवर प्रसारित होत असून यापुढे निराश उमेदवारांकडून चुकीचे पाऊल उचलण्यात येण्याची शक्यता आदिवासी संघटनांकडून वर्तवण्यात येत आहे.