हिंगोली: फ्लिपकार्ट कंपनीच्या वस्तूचे टपाल घेऊन जाणाऱ्या मालमोटरीला अडवून सुमारे आठ लाखाचे साहित्य लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना पकडण्यात हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. जिल्हा पोलीस अधीक्षकाने पोलीस पथकाला दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले. या दरोड्यात म्हणजे फ्लिपकार्ट कंपनीतील माजी व्यवस्थापकासह दोन चालकांनी हा कट रचल्याचे कबुली आरोपींनी दिली. आरोपींकडून वाहनांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
वसमत तालुक्यातील भेंडेगाव पाटीजवळ फ्लिपकार्ट कंपनीचे पार्सल घेऊन जाणाऱ्या मालमोटर समोर मोटरकार आडवी लावून दरोडेखोरांनी ७ लाख ७७हजारांचे पार्सल सामान व दोन मोबाइल लुटल्याची घटना ११ जून रोजी पहाटे घडली होती. मालमोटारीचे चालकाच्या सहाय्यकासही मारहाण झाली होती. या प्रकरणी कुरूंदा पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यातील दरोडेखोरांना पकडण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने दरोडेखोरांचा शोध सुरू केला.
तपासात हा दरोडा ज्ञानेश्वर प्रकाश खानजोडे (रा.निजामपूर ता.रिसोड जि.वाशिम),परमेश्वर ज्ञानबा चौधरी (रा.निजामपूर ),शंकर दत्तराव काळे(रा.घोणसर ता.रिसोड), मंगेश नारायण काटे (रा. बेंदरवाडी ता.रिसोड), मो.युसूफ मो.ख्वाजा (रा. मुल्लागल्ली,रिसोड),अभिषेकगजानन हलगे (रा.आसनगल्ली रिसोड),सर्वेश कैलास धृत (रा. शिवाजी कॉलनी रिसोड),नागनाथ रामराव राऊत (रा. नेरली ता. नांदेड), अमर इंगोले (रा.वडारवाडा रिसोड), मारोती भुताडे (रा. खानापूर ता. देगलूर जि. नांदेड) यांनी कट रचून टाकल्याचे समोर आले.
पथकाने यातील आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी फ्लिपकार्ट कंपनीचे पार्सल वाहन चालक नागनाथ राऊत व मारोती भुताडे यांच्या सांगण्यावरून व रिसोड येथील फ्लिपकार्ट कंपनीचा तत्कालीन व्यवस्थापक सर्वेश धूत यांच्या नियोजना प्रमाणे हा गुन्हा केल्याची कबुली दिली.