हिंगोली: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांतराचा वेग वाढला असून सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगेसह इतर पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पतंगे शरद पवार गटात कार्यरत होते.
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमाेर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बांधणीला सुरुवात केली आहे. अनिल पतंगे यांच्यासमवेत सेनगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कैलासराव देशमुख, तालुकाध्यक्ष रवी गडदे आदीजण पक्षांतर करणार आहेत.
सेनगाव तालुक्यातून जास्तीत जास्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणण्याची रणनीती आमदार राजेश नवघरे यांनी आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षांतराबाबत बोलताना पतंगे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ८ जून रोजी सेनगाव तालुका दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आम्ही सर्वजण अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत.