हिंगोली : शासकीय रुग्णालयात चेहरा पडताळणी (फेस डिटेक्शन) व आधाराधारित ‘बायोमेट्रिक’मुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे बिंग फुटले आहे. कोणाची चार दिवस तर कोणाची १० ते १५ दिवसांची गैरहजेरी आढळून आली. या प्रकारानंतर २५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय रुग्णालयात दररोज किमान ६०० रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये कळमनुरी, सेनगाव, हिंगोली व औंढा नागनाथ तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. मात्र वसमत तालुक्यातील गंभीर आजारी रुग्ण उपचारासाठी नांदेड येथे जातात. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना दिलेल्या कर्तव्याच्या दिवशी हजर राहणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वेळा अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याचे चित्र होते. त्यामुळे थेट शासनापर्यंतही तक्रारी गेल्या होत्या.

दरम्यान, शासनाने रुग्णालयांमधून आधारबेस बायोमेट्रिक हजेरी तसेच चेहरा पडताळणी हजेरी देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १ एप्रिलपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या हजेरीला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेच नाही. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ऑनलाइन हजेरी काढली असता त्यात अनेक जण महिन्यातून काही दिवस गैरहजर असल्याचे दिसून आले. यामध्ये काही कर्मचारी दोन दिवस तर काही जण ४ ते ८ दिवस गैरहजर होते. तर काही वैद्यकीय अधिकारीही ८ ते १० दिवस गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकारानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी तब्बल २५० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, अधिपरिचारिका, कक्ष सेवक, आरोग्य सेवक यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना तातडीने खुलासा सादर करावा अन्यथा वेतन कपातीचा इशारा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाच वेळी २५० जणांना कारणे दाखवा नोटीस मिळाल्यामुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आता खुलासे असमाधानकारक असल्यास वेतन कपातीची कारवाई होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.