जालना : वारंवार होणाऱ्या घरफोडीस वैतागलेल्या जालना शहरातील एका वकिलाने चक्क अज्ञात चोरांनाच खुले पत्र लिहिले असून, ते आपल्या घरावर लावले आहे. विशेष म्हणजे त्यानंतर संबंधित वकिलाच्या घराकडे चोरटे फिरकले नाहीत.

ॲड. ललित हट्टेकर यांचे जालना शहरातील एस. टी. काॅलनीत वडिलोपार्जित घर आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली होती. परंतु अद्याप चोरीचा तपास लागलेला नाही. त्यानंतर त्यांच्या घरी तीनदा घरफोडी झाली. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. या तीन घरफोड्यांची तक्रारही त्यांनी पोलिसांत दिली नाही. मात्र, चोरट्यांना उद्देशून लिहिलेले पत्र मात्र घरावर लावले.

माननीय चोरसाहेब, सस्नेह नमस्कार, अशी या जाहीर निवेदनवजा पत्राची सुरुवात करून ॲड. ललित हट्टेकर यांनी म्हटले आहे की, जोखीम त्याचप्रमाणे तंत्रज्ञान, समन्वय आणि जीवावर उदार होऊन आपण करीत असलेल्या कलेला वंदन. आपली ओळख नाही. परंतु तीन चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाटेस निराशा आली असेल. एक वेळेस मात्र, आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेला.

आपण, पत्नी आणि मुलासह घरात राहतो. घरात सोने-चांदी तसेच पैसे नाहीत. भांडीकुंडी, वाॅशिंग मशीन व इतर सामान आहे. त्यामुळे घरफोडी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. कडी-कोयंडे तोडल्यामुळे माझे नुकसान होते. चोरीसाठी तुम्हाला ही जागा आदर्श वाटत असेल. मोठी रक्कम दिल्यावर हे घर तुम्हाला विकू शकतो. मग तुम्ही तेथे अवैध धंदे करू शकाल, असेही अज्ञात चोरांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ॲड. हट्टेकर यांनी म्हटले असून, स्वत:कडे शस्त्र परवाना असल्याची जाणीवही करून दिलेली आहे.