जालना – दर्जाच्या संशयावरुन अन्न व औषधी प्रशासनाने जालना जिल्ह्य़ात १३ हजार ८९९ किलो खाद्यतेल जप्त केले आहे. या जप्त खाद्यतेलाची किंमत २१ लाख २७ हजार ७४२ रुपये आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे जालना जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.’ सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा’ ही मोहीम अन्न व औषध प्रशासनाकडून ऑगस्ट महिन्यापासून राबविण्यात येत आहे.
विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत जालना शहरासह जिल्ह्यातील खाद्यपदार्थ उत्पादक, मिठाई उत्पादक व विक्रेते यांची तपासणी करुन ४१ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
दूध, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, मिठाई आणि सुकामेवा आदी अन्नपदार्थांचे हे नमुने आहेत. त्याचप्रमाणे कमी दर्जाच्या संशयावरुन जप्त खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ही मोहिम दिवाळीपर्यंत राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी परवाना व नोंदणीधारक विक्रेत्याकडुनच खरेदी करावी, मिठाई व नाशवंत अन्न पदार्थांची योग्य तापमानावर साठवणूक करावी असे आवाहन अन्न व औषधी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.