कराड : कोयना शिवसागरात यंदाच्या एक जून या जलवर्षाच्या प्रारंभापासून गेल्या चार महिन्यात १७२.५९ अब्ज घनफूट /टीएमसी (१६३.९८ टक्के) जलआवक, तर कोयना पाणलोटात ६,२८९.६६ मिलीमीटर वार्षिक सरासरीच्या १२५.७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परतीचा पाऊसही बरसतच असल्याने सरासरी पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

याखेपेस पावसाळ्याला वेळेत सुरुवात होऊन सलग चार महिने पावसाची कामगिरी उत्तम राहिली आहे. परतीच्या पावसाचाही जोरदार तडाखा बसणे सुरूच आहे. कोयना पाणलोटक्षेत्रात यंदा भरघोस पाऊस झाला आहे. १०५.२५ अब्ज घनफूट क्षमता असलेल्या कोयना शिवसागर भरभरून वाहिला आहे. आजमितीला गतवर्षीच्या तुलनेत तो १२.२३ अब्ज घनफुटाने अधिकचा राहिला आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद ९,४६३ घनफूट पाण्याची आवक होताना सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. धरणाचे सहापैकी चार वक्र दरवाजे एक फुटांनी उचलून ६,३६४ घनफूट आणि पायथा वीजगृह कार्यान्वित असल्याने त्यातून २,१०० घनफूट असे एकूण ८,४६४ घनफूट पाणी कोयना नदीत सोडण्यात येत आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोयना धरणाच्या १ जून या तांत्रिक वर्षाच्या सुरुवातीपासून यंदा आजवर कोयनेच्या सहा वक्र दरवाजातून आजवर विनावापर ५८.०५ अब्ज घनफूट पाणी (धरण क्षमतेच्या ५५.१५ टक्के) कोयना नदीत विनावापर सोडण्यात आले आहे. तर, पायथा वीजगृहातील वीज निर्मितीसाठी ८.२८ अब्ज घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. सिंचनासाठी १,१६ अब्ज घनफूट, तर पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी १६.४३ अब्ज घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. एकूणच कोयनेचा पाणीसाठा, त्यातून वीज निर्मिती आणि पाणलोटातील पर्जन्यमान समाधानकारक राहिल्याने कृष्णा- कोयना नद्यांकाठची वर्षंभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.