कराड : भाजप हा देशाच्या भविष्याचा विचार करणारा पक्ष आहे. येत्या काळात जगातील सर्वात मोठी ताकद हा पक्ष ठरेल असा विश्वास देताना, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम व कष्ट करून आपल्या भाजपला बळकट करूया, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. सातारा जिल्ह्यात पक्षाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याचे कौतुकोद्गार लोढा यांनी काढले.

कराडमध्ये भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार आनंदराव पाटील, सत्यजित पाटणकर, चित्रलेखा माने- कदम, सुरभी भोसले, रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोढा म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यात कार्यकर्ते हे भाजपची सर्वात मोठी ताकद आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राबवलेल्या अनेक लोकहिताच्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोचवायची आहे. व्यवसाय, नोकरी करत अनेकजण पक्षकार्यात योगदान देत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, समाजासाठी काम करू इच्छित असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी भाजप हा सर्वात चांगला पक्ष असल्याचा विश्वास लोढा यांनी दिला आहे.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सातारा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनवणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपा, महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाबरोबर चर्चा करून लढायचे आहे. कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका ठेवणार आहोत. जिल्ह्याची कार्यकारणी ही मोठी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा हा जिल्हा आहे. स्थानिक ठिकाणी समन्वयातून कार्यकारिणी वाढवणार आहे. पक्ष वाढविण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहूयात. जुने कार्यकर्ते व नवीन कार्यकर्ते यांचा चांगला समन्वय घडवून आणणार आहे.

मनोज घोरपडे म्हणाले, भाजप हा केवळ निवडणुकी पुरता काम करत नाही, तर बाराही महिने कार्यरत असतो. पक्षाचा मतदान केंद्र प्रमुख, कार्यकर्ता, मंडलाध्यक्ष सतत पक्षकार्यात व्यस्त असतात. तसेच पक्षही कार्यकर्त्यांना सतत नवनवीन उपक्रम राबवण्यास व्यस्त ठेवत असल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढत जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑलम्पिकवीर खाशाबांना अभिवादन

ऑलम्पिकवीर पैलवान (कै.) खाशाबा जाधव यांनी आजच्याच दिवशी भारताला वैयक्तिक खेळाचे पहिले ऑलम्पिक पदक मिळवून दिले होते. यानिमित्ताने मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, तसेच पक्षाचे पदाधिकारी यांनी गोळेश्वर येथे ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी खाशाबांचे पुत्र रणजित जाधव व कुटुंबिय तसेच कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे उपस्थित होत्या.