अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील मढी येथील एका समाजाचे धार्मिकस्थळ अनधिकृत असल्याचा आरोप करत तेथील ग्रामसभेत हे अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मढी गावात दोन प्रार्थनास्थळे आहेत, त्यापैकी श्रीराम चौकातील एक अनधिकृत असल्याने हे अतिक्रमण काढून टाकले जाणार असल्याचे सरपंच संजय मरकड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मढी येथे आयोजित केलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय मरकड होते. या वेळी ग्रामसेवक गणेश ढाकणे उपस्थित होते. ठरावाला सूचक म्हणून बबन पाखरे तर अनुमोदक म्हणून सागर निकम यांनी सही केली. या ग्रामसभेकडे मात्र काही ग्रामपंचायत सदस्यांनी पाठ फिरवली.
ग्रामसभेत बोलताना मरकड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गरिबांना घरकुले मंजूर केली आहेत. अन्न, वस्र, निवारा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. आपल्या गावात एका समाजाच्या स्मशानभूमीची १० एकर जागा असतानाही पुन्हा आणखी अतिक्रमण करण्यात आले आहे. मढी येथे कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मंदिर मार्गावर असलेल्या चौकातील जागेतच अनधिकृत धार्मिकस्थळ उभारण्यात आले असून, या स्थळाचा मढी येथे येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ज्या ठिकाणी हे धार्मिकस्थळ उभारण्यात आले आहे ती जागा ही मढी देवस्थानची असून, या संदर्भात संबंधित धार्मिकस्थळ उभारणाऱ्यांना ग्रामपंचायतीने आपली जागा असल्याची कागदपत्रे, बांधकाम परवाना मागितला असून, अद्याप ही कागदपत्रे ग्रामपंचायतीला देण्यात आली नाहीत. आम्ही या धार्मिकस्थळाची कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात शोधली, मात्र ती सापडत नसल्याने हे धार्मिकस्थळ पाडण्याचे ठरले आहे. या लोकांकडे जर कागदपत्रे असतील तर त्यांनी ती दाखवावी. मढी गावातील जे अतिक्रमण आहे ते काढून टाकून त्या ठिकाणी घरकुले बांधायला हवी. मढी गावासाठी ३० लाख रुपयांचा जलजीवन योजनेचा निधी आला होता. मात्र आमदार राजळे यांनी तो थांबवून ठेवला, असा आरोपही या वेळी मरकड यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी मढीच्या ग्रामसभेत मढी यात्रेत एका धर्माच्या व्यापाऱ्यांना व्यापार न करू देण्याचा ठराव करण्यात आला होता. ग्रामसभेतील या निर्णयाने मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाथर्डीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेत, हा ठराव रद्द करण्याची कारवाई केली होती.