नांदेड : माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांचे पुतणे आणि नांदेडचे माजी नगरसेवक उदय दामोदरराव चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असून त्यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी मुंबईमध्ये भेट घेतल्याची माहिती येथे आली आहे.

खासदार चव्हाण यांचे स्थानिक पातळीवरील एक पुतणे नरेन्द्र चव्हाण यांची अलीकडेच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. उदय चव्हाण हेही नात्याने खा.चव्हाण यांचे पुतणेच आहेत. १९८०च्या दशकात ते पैठणहून नांदेडमध्ये आल्यानंतर पुढील बरीच वर्षे अशोक चव्हाण यांचे स्थानिक राजकारणातील सहकारी म्हणून ओळखले गेले. १९९०च्या दशकात मात्र ते भाजपामध्ये गेले. सुरुवातीला काँग्रेस आणि मग २००२ ते २००७ या दरम्यान ते नांदेडमध्ये नगरसेवकही होते.

भाजपामध्ये तत्कालीन खासदार डी.बी.पाटील यांचे निकटवर्ती राहिल्यानंतर उदय चव्हाण हे पुन्हा अशोक चव्हाण यांच्या निकट आले, तरी चव्हाणांच्या राजकारणापासून ते दूरच होते. काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांनी त्यांना धर्माबादच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात प्राध्यापकपदाची संधी दिली. तेथे सुमारे ७ वर्षे सेवा बजावल्यानंतर अलीकडे ते नोकरीतून निवृत्त झाले. दीड वर्षांपूर्वी अशोकरावांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तरी उदय यांनी त्यांच्या पाठोपाठ भाजपात प्रवेश करणे टाळले. निवृत्तीनंतर ते शेती व इतर व्यवसायात कार्यरत आहेत.

आ.चिखलीकर यांच्याशी उदय चव्हाण यांचा खूप जुना स्नेह आहे. त्यातूनच त्यांनी चिखलीकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी भेट घेतल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. उदय चव्हाण यांनी आपली राजकीय भूमिका अद्याप उघड केलेली नाही. पण त्यांच्या पक्षप्रवेशाच्या शक्यतेला आ.चिखलीकर यांनी दुजोरा दिला.

गेल्या दीड-दोन महिन्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्यात दोनदा येऊन गेले. या दोन्ही दौर्‍यांमध्ये त्यांच्या उपस्थितीत दोन भव्य पक्षप्रवेश सोहळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा पक्षप्रवेश सोहळा येत्या ११ मे रोजी मुखेड तालुक्यात होणार आहे. वेगवेगळ्या पक्षांतील अनेक प्रमुख कार्यकर्ते आमच्या पक्षात दाखल होणार असल्याचे चिखलीकर यांनी मुंबईहून सांगितले. या सोहळ्याचा तपशील ते लवकरच जाहीर करणार आहेत.

अशोक चव्हाण यांचे मेव्हणे व माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी गेल्या महिन्यातच पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर चव्हाण कुटुंबातील एक प्रतिनिधीही अजित पवारांच्या पक्षाच्या वाटेवर गेला आहे.