नांदेड : पालकमंत्री अतुल सावे यांच्या बुधवारच्या दौरा कार्यक्रमामध्ये ‘शंकर स्मृती’ इमारतीत भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक असा उल्लेख होता. पण ही बैठक आणि तेथील भोजनास मर्यादित प्रवेशाचा प्रयोग राबविण्यात आल्यामुळे यादीमध्ये नाव नसलेल्या पदाधिकार्‍यांवर तेथून माघारी फिरण्याचा प्रसंग ओढवला.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम, त्यानंतरचे अन्य उपक्रम-बैठका, वेगवेगळ्या शिष्टमंडळाच्या भेटी, भाजपाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री सावे दुपारी व्हीआयपी मार्गावरील ‘शंकर स्मृती’ इमारतीमध्ये खा.अशोक चव्हाण यांच्यासह पोहोचले.

दौरा कार्यक्रमानुसार तेथे भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक असल्याचे दिसून आल्यामुळे वेगवेगळ्या भागांतील भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी बुधवारी सकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. त्यांतील बहुतेक सारे जण इतर सार्वजनिक कार्यक्रमांतही दिसले; पण ‘शंकर स्मृती’त जे प्रवेशपात्र होते, त्यांची यादी बंदोबस्तावरील पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली होती. यादीत नाव नसलेले काही जण तेथे गेले; पण त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही, असे सांगण्यात आले.

खा.अशोक चव्हाण यांनी याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर पालकमंत्री, खासदार-आमदार, पक्षाचे तीन जिल्हाध्यक्ष आणि आपले निवडक समर्थक यांच्याकरिता ‘भोजन इंतजाम’ केला होता. या सार्‍यांना स्वतंत्रपणे निमंत्रण देण्यात आले; पण वरील ठिकाणी पदाधिकार्‍यांची बैठक आहे, या समजुतीतून गेलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना इमारतीच्या आत प्रवेश दिला गेला नाही. त्यांतील काहींनी मग तेथून जवळच असलेल्या हॉटेलमधील ‘मधुर’ भोजनाचा आस्वाद घेतला.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस पक्षाचे राज्यसभेचे दोन्ही खासदार, आमदारांतून केवळ डॉ.तुषार राठोड, तीन जिल्हाध्यक्ष, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, किशोर स्वामी, राजेश कुंटूरकर प्रभृती उपस्थित होते. यजमान नेत्याच्या काही लाडक्या समर्थकांनाही तेथे प्रवेश होता; पण माजी आमदार राम पाटील रातोळीकर, माधवराव उच्चेकर, लक्ष्मण ठक्करवाड, श्रावण भिलवंडे, माजी महानगराध्यक्षांपैकी प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते इत्यादी जुन्या मंडळींना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याने पक्षातील धुसफूस समोर आली.

आमदार आणि जिल्हाध्यक्षांना वरील बैठकीचे निमंत्रण पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आले. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मित्रपक्षांशी युती करायची किंवा कसे इत्यादी बाबींवर बैठकीत चर्चा झाली. जि.प. आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत पक्षाच्या आमदारांनी आपापले मतदारसंघ सांभाळावेत, मी भोकर मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारतो, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्याचे समजते. निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी नांदेड महानगर तसेच जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासाठी शासनाकडून विशेष मदत व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली.

बैठकीतून काय साधले?

नांदेड भाजपाच्या जिल्ह्यातील तीन संघटनात्मक जिल्ह्यांची नवीन कार्यकारिणी अलीकडे जाहीर करण्यात आली. पालकमंत्री अतुल सावे यांनी बुधवारी बराच वेळ येथे दिला. त्यांच्या उपस्थितीत तीन संघटनात्मक जिल्ह्यांच्या कार्यकारिणीची संयुक्त बैठक धेता आली असती; पण त्याऐवजी मर्यादित बैठक घेऊन काय साधले, असा सवाल एका माजी पदाधिकार्‍याने केला.