नांदेड : शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा, या उक्तीला साजेसा आदर्श दाखवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदबोरी (चि.) ता.किनवट या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात तालुक्यातील द्वितीय क्रमांक पटकावत २ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.

या उपक्रमाअंतर्गत शाळांची वस्तुनिष्ठ मूल्यांकन चाचणी पंचायत समितीच्या पथकाद्वारे करण्यात आली. यात पायाभूत सुविधा, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक संपादने या १५० गुणांच्या निकषांवर तपासणी झाली होती.

आंदबोरी (चि.) शाळेने शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाळेत डिजिटल वर्ग, सीसीटीव्ही सुरक्षायंत्रणा, बोलक्या भिंती, शालेय बचत बँक, आनंददायी शनिवार, स्पर्धा परीक्षा तयारी, डिजिटल ई-लर्निंग, तंबाखूमुक्त शाळा, परसबाग, सहली, क्रीडा महोत्सव अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड, विस्तार अधिकारी वैशाली आडगावकर, केंद्रप्रमुख अविनाश दासरवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू जाधव व उपाध्यक्ष अंबादास पवार यांनी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शेळके, सुदर्शन येरावार, प्रल्हाद गित्ते, नितीन सावरगावे, अकबर मोमीन व रूपाली तेलंग यांचे अभिनंदन केले.

शाळेत ११४ विद्यार्थी

सध्या शाळेत ११४ विद्यार्थी शिक्षण घेत असून सहा शिक्षक कार्यरत आहेत. हे सर्व शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. शाळेतील सकारात्मक बदल पाहून ग्रामस्थ भारावून गेले असून अनेक पालक इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळेत पुनःप्रवेश करत आहेत, अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली.

आंदबोरी हे गाव नांदेड – तेलंगणा सीमेवर आहे. या गावात आजही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जात नाही. येथील सर्व व्यवहार हे तेलंगणातल्या अदिलाबाद येथून होतात. पूर्वी या गावातील शाळेची परिस्थिती अत्यंत दयनिय होती. पण गेल्या काही वर्षात शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेचा काया पालट झाला आहे. विशेष म्हणजे दोन दशकापूर्वी याच गावातील विद्यार्थी नांदेडमधून शिक्षण घेऊन वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत.