नांदेड : ‘पुस्तक म्हणजे गोठवून ठेवलेला काळ. या गोठलेल्या काळाला उबदार हातांचा स्पर्श झाला की, हा ‘गोठलेला काळ’ही वितळतो आणि आपली ‘स्व’च्या शोधाची यात्रा सुरू होते. त्यासाठीच ‘डिजीटल ओव्हरलोड’च्या सध्याच्या जमान्यात समाज माध्यमांपासून थोडी विश्रांती घेऊन पुस्तकांशी आणि स्वतःशी नातं निर्माण करण्यासाठी यशवंत महाविद्यालयातील ‘जेन झी’द्वारे ‘यशवंत बुकीज’ हा सर्जनशील एकत्रित-वाचन प्रयोग ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिना’पासून सुरू करण्यात आला.

आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या माध्यमातून शॉर्ट व्हीडीओज, रील्स, स्टोरीज आणि नोटिफिकेशन यांचा मेंदूवर सतत भडिमार होत आहे. त्याचा थेट परिणाम स्मरणशक्ती, एकाग्रता, कल्पनाशक्ती आणि झोपेवर होतो; परंतु वाचनही एक प्रकारचे मेडिटेशन असल्याने त्यातून ‘रुह का सुकून’ अनुभवता येतो. याच उद्देशाने टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर शंतनु नायडू यांच्या ‘मुंबई बुकीज’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत नांदेडमध्ये राबविण्यात येणार आहे.

मुंबई, पुणे, बंगलोर, जयपूर सारख्या महानगरांमध्ये बुकीजचा प्रकल्प यशस्वीपणे चालतो. नरहर कुरुंदकरांच्या विचार आणि विवेकाचा वारसा असलेले नांदेड शहरही महानगर बनण्याकडे वेगाने वाटचाल करत असल्याने इथल्या सजग नागरिकांची वाचनाची तहान भागवणे आणि त्यानिमित्ताने एक विस्तृत सर्वसमावेशक ‘पुस्तकप्रेमी क्लब’ या प्रकल्पातून निर्माण करणे हा मूळ उद्देश. त्यासाठी पुढील काळात दर महिन्यात सुट्टीच्या एका दिवशी नियमितपणे किमान एक तास आवडत्या पुस्तकाचे ‘एकत्रित वाचन’ करण्याचा बेत ‘वाचन कट्ट्या’च्या तरुण विद्यार्थ्यांनी ठरवला. विद्यार्थ्यांसोबतच अनेक जागरूक पालकांनीही यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली.

बुकीजच्या प्रथम पर्वात तब्बल चाळीसच्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मक्तुब, झाडाझडती, किमयागार, श्यामची आई, मन में है विश्वास, मास्तरांची सावली, बुद्ध चरित्र, अंतः अस्ति प्रारंभः, प्रज्वलित मने (इग्नायटेड माइंडज्), अग्निपंख, मी मलाला, माझे सत्याचे प्रयोग, मृत्युंजय, गांधी-पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा, जागर, द हिडन हिंदू , अर्थाच्या शोधात, हैदराबाद मुक्तिसंग्राम, नक्षलवादाचे आव्हान इत्यादी महत्वाच्या पण गंभीर पुस्तकांचे वाचन करून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवांचा जागर आणि आत्मचिंतनाची चिरनिद्रा यांचा दुर्मीळ संगम अनुभवला.

यावेळी यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे आणि इतर प्राध्यापकांनीही मुलांसोबत वाचन कट्ट्यावर ‘नो सेलफोन झोन’मध्ये तासभर एकत्र वाचनाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे शेवटी प्रत्येक वाचकासाठी कला कट्ट्याने स्वतः बनवलेले आकर्षक प्रिंटेड व हॅण्डमेड बुकमार्क भेट म्हणून देण्यात आले.

उद्घाटनावेळी प्राचार्यांचा हस्ते ‘यशवंत बुकीज’चा लोगो असणारे फुगे आकाशात सोडून समृद्ध वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी तरुणाईने असाच सक्रिय पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमाच्या अभिरुची फिल्म क्लबच्या अध्यक्ष हिंदवी जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना प्राचार्यांनी माणसांपासून दूर आणि फोनशी ‘क्लोज रिलेशनशिप’ प्रस्थापित होणाऱ्या ‘डिजिटल युगा’त पुस्तकांशी मैत्री करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. ‘यशवंत बुकिज’च्या इंस्टाग्राम हॅण्डलवर प्रसिद्धी करण्यासाठी पूनम भोसले यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या शूटिंगची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.

कार्यक्रमाच्या यशासाठी उपक्रमशील प्राध्यापक डॉ.विश्वाधार देशमुख यांच्या मार्गर्शनाखाली वाचन कट्ट्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन ‘आम्ही वाचतोय; तुम्हीही वाचा’ हा संदेश आपल्या वाचन कृतीतून अधोरेखित केला.