सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नियोजित म्हसवड एमआयडीसीला ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा दर्जा मिळावा, या आग्रही मागणीसह जिहे-कठापूर आणि उरमोडी पाणी योजनांसंदर्भात चर्चा झाली. या वेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेत माण खटाव मतदारसंघातील म्हसवड येथील औद्योगिक वसाहतीला राज्य शासनाने मंजुरी देऊन जमीन अधिग्रहणासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. या औद्योगिक वसाहतीला केंद्राकडून ‘ग्रीन कॉरिडॉर’ दर्जा मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर योजनेच्या वाढीव कामांना राज्य शासनाने २०२४ मध्ये मान्यता दिली आहे.
उरमोडी योजनेच्या कामांचीही सुधारित किंमत तीन हजार ४२ कोटी ठरविण्यात आली आहे. या योजनेची निम्मी कामे झाली असली, तरी उर्वरित कामांसाठी केंद्राच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिहे कटापूर आणि उरमोडी वाढीव योजना प्रधानमंत्री कृषी योजनेत घेऊन निधीची तरतूद करण्याबाबत पंतप्रधान मोदींबरोबर चर्चा करण्यात आली. नव्याने निर्माण होत असलेल्या मुंबई-बंगळूर महामार्गालगत लगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रिक उभारणीचे प्रयोजन आणि त्याबाबत कार्यवाहीची चर्चा करण्यात आली.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर भरीव नदीसह पूर्ण होणे गरजेचे असल्याने त्या कामाला गती देण्याविषयी पंतप्रधानांबरोबर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी मंत्री गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले.
पंचायत राज अभियान
ग्रामविकास मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती. पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेत माण खटाव मतदारसंघातील म्हसवड येथील औद्योगिक वसाहतीला राज्य शासनाने मंजुरी देऊन जमीन अधिग्रहणासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. या औद्योगिक वसाहतीला केंद्राकडून ‘ग्रीन कॉरिडॉर’ दर्जा मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार असल्याचे सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली.