पंढरपूर : रोजगार हमी योजनेतील रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या रोजंदारीत लवकरच वाढ होणार आहे. येत्या अर्थसंकल्पात याबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. तर ज्या ठिकाणी पालकमंत्रीबाबत तिढा निर्माण झाला आहे . त्याबाबत दोन दिवसात तिढा सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतल्यानंतर गोगावले माध्यमांशी बोलत होते. या वेळी मोहोळचे राष्ट्रावादीचे(शरद पवार) आमदार राजू खरे उपस्थित होते.ते म्हणाले, की सध्या रोजगार हमी योजनेतील रोजंदारीचे दर कमी आहेत. त्यात वाढ होईल. जेणेकरून त्यांच्या हाती चांगला पैसा मिळेल. या बाबत येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू खरे तुमच्या सोबत आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, राजू आणि माझी जुनी मैत्री आहे. सर्व ठिकाणी राजकारण पाहू नका, मैत्री आहे, असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींवर टीका

राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहिली असल्याचे विचारताच गोगावले यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधी मूर्ख आहेत. त्याना जयंती आणि पुण्यतिथीमधील फरक समजत नसावा. संजय राऊत यांनी उबाठा संपवण्याची सुपारी घेतली आहे. ते जे काही बोलतात त्याचे एक तर उलटे होते किंवा महायुतीला फायदा होतो अशी टिप्पणीही गोगावले यांनी केली. तर धनंजय मुंडेप्रश्नी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. त्यावर मी बोलणे उचित ठरणार नाही. असे ते म्हणाले.