राहाता: शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात साईबाबा यांनी दिलेली ९ नाणी माझ्या अध्यक्षतेखालील ट्रस्टकडे असल्याचे सांगताना, साईबाबांच्या हाताची डीएनए चाचणी करावी, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांनी आज, बुधवारी गायकवाड यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या घरावर मोर्चा काढला.
काल, मंगळवारी पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी सांगितले होते की, धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात ९ नाणी माझ्या अध्यक्षतेखालील ट्रस्टकडे आहेत. साईबाबांच्या हाताची डीएनए चाचणी करावी, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचा निषेध करत शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांनी आज गायकवाड यांचा निषेध व्यक्त करत, त्यांच्या घरावर मोर्चा काढला. गायकवाड यांना गावात राहण्याचा अधिकार नाही. साई संस्थान प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
साईबाबांविषयी माझ्याकडून चुकून शब्दप्रयोग झाल्याचा उल्लेख करीत अरुण गायकवाड यांनी जाहीर माफी मागितली असली तरीही ग्रामस्थांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. याबाबत सायंकाळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी अरुण गायकवाड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नाणी संस्थांनकडे जमा करा
शिंदे परिवाराने आपल्याकडील साईबाबांनी दिलेली ९ नाणी साई संस्थानकडे जमा करण्याचा निर्णय या बैठकीत बोलून दाखवला. अनेकांनी अरुण गायकवाड व परिवाराचा निषेध व्यक्त करताना त्यांच्याकडील नाणीसुद्धा साईबाबा संस्थानने जमा करून घ्यावी, जेणेकरून त्याचा दुरुपयोग व गैरप्रकार होणार नाही, अशी भावना व्यक्त केली. श्रीसाईबाबा संस्थानने या वादात दोन्ही बाजूंना नोटीस बजावली. सध्या शिर्डीत या ९ नाण्यांवरून सुरू असलेल्या वादामुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.