अलिबाग : इर्शाळवाडी दरड दुर्घटना आणि जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील ६ हजार १५९ जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. ४६ ठिकाणी या स्थलांतरीत लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरपासून पावसाचा जोर कायम आहे. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, पूर येणे, रस्ते खचणे, धरणाला गळती लागणे, या सारख्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या सातत्याने दुथडी भरून वाहत आहेत. अशातच इरशाळवाडी येथील दरड दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५७ जण बेपत्ता आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने दरडींचा आणि पूराचा धोका असलेल्या गावांमधील नागरीकांचे स्थलांतरण सुरु केले आहे.
जिल्ह्यातील २० संभाव्य दरडग्रस्त गावातील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिले होते. या शिवाय इतर दरड प्रवण गावांची पहाणी करून गरज असल्यास नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. यानंतर सर्व तालुक्यांनी नागरीकांना स्थलांतरीत करण्याची मोहीम सुरू केली आहे.
अलिबाग १२८, पेण २५६, मुरूड ४०, कर्जत ३९२, खालापूर ४२१, रोहा १३५१, तळा १५०, माणगाव १६३, महाड २२०८, पोलादपूर ४७९ आणि श्रीवर्धन तालुक्यातील ४२ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आपदग्रस्तांसाठी ४६ कँम्प सरु करण्यात आले असून त्यात १७७६ स्थलांतरीत कुटूंबातील ६१५९ जणांना ठेवण्यात आले आहे. आवश्यकते नुसार अजूनही काही जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले जाणार आहे.
हेही वाचा… इर्शाळवाडीनंतर राज्य सरकारला जाग, ‘या’ दोन दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला मंजुरी
अतिवृष्टीचे २८ बळी…
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे इर्शाळवाडी येथे दरड कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. तर ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषीत करण्यासाठीचा प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठविण्यात आला आहे. तर सुधागड पाली तालुक्यात ठाणाळे नदीत चिमा पांडू वारा यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २८ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून, ५७ जण बेपत्ता आहेत.
पावसामुळे मोठी वित्तहानी….
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आत्ता पर्यंत १६ पक्क्या घरांचे तर ४० कच्च्या घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर २२१ पक्क्या घरांचे अंशतः तर ११५ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. २७ गोठे आणि १ पोल्ट्रीशेडचेही नुकसान झाले आहे. या शिवाय ११ सार्वजनिक मालमत्तांची पडझड झाली आहे.
रायगड जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजे पर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी १०४ मिमीपावसाची नोंद झाली असून पोलादपूर, कर्जत, खालापूर, महाड , माणगाव तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ पैकी २४ लघु पाटबंधारे प्रकल्प पुर्ण क्षमतेनी भरली आहेत.