अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या २५ ने घटली आहे. अपघातात गंभीर जखमींची संख्याही घटली आहे. पण त्याच वेळी अपघातात मृतांची संख्या वाढली आहे ही एक चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात २०१९ पर्यंत दरवर्षी सरासरी १ हजार अपघातांची नोंद होते. यात सरासरी अडीचशे ते तिनशे लोकांचा मृत्यू होत होते. तर सातशे ते आठशे जण जखमी होत होते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील अपघातांची संख्या सातत्याने घटत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात जानेवारी २३ ते सप्टेंबर २३ अखेर पर्यंतच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण ५१६ अपघातांची नोंद झाली ज्यात २१८ जणांचा मृत्यू झाला. ४२० जण गंभीर जखमी झाले, तर १९१ जण किरकोळ जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातांची संख्या कमी झाली असली तरी अपघातात मृतांची संख्या साततत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मुबंई गोवा महामार्गावर १४५ अपघात झाले. यात ६० जणांचा मृत्यू झाला. तर १५७ जण गंभीर जखमी झाले. मुंबई पुणे जुन्या महामार्ग ५३ अपघातांची नोंद झाली. यात २४ जणांचा मृत्यू झाला तर ५३ जण गंभीररीत्या जखमी झाले. मुंबई पुणे दृतगती मार्गावर ५९ अपघात नोंदविले गेले. यात १८ जणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले.
हेही वाचा : “लांडग्यांचं अस्तित्व…”, गोपीचंद पडळकरांनी पवारांवर केलेल्या टीकेवर मुनगंटीवारांची भलतीच प्रतिक्रिया
वडखळ अलिबाग राष्ट्रीय महामार्गावर १९ अपघात झाले ज्यात ५ जणांचा मृत्यू झाला. पेण खोपोली महामार्गावर आठ अपघातात ९ जण दगावले. खोपोली वाकण महामार्गावर ३ अपघातात एकाचा मृत्यू झाला. दिघी माणगाव महामार्गावर १५ अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील राज्यमार्गांवर १०३ अपघातांची नोंद झाली. ज्यात ५४ जणांचा मृत्यू झाला. तर जिल्हा मार्गांवर १११ अपघातांची नोंद झाली. ज्यात ४२ मृत्यू नोंदविले गेले.
जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या वर्षात रस्ते अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जखमी होणाऱ्यांची संख्याही घटण्यास सुरवात झाली आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र त्याच वेळी अपघातांमधील मृतांची वाढती संख्या ही एक चिंतेची बाब असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पुणे दृतगती मार्गावर स्पीड कॅमेरे बसविल्यानंतर अपघातांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येत आहे. पण त्याच वेळी मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याने या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अद्यापही जास्त आहे. वर्षभरात हे काम पुर्णत्वाकडे गेले तर अपघातांचे प्रमाण आणखीन कमी होईल असा अंदाज रायगड पोलीसांनकडून व्यक्त केला जातो आहे.
हेही वाचा : “…ते तर तिथे बूट चाटत बसलेत”, साहेब, ताई, दादा म्हणत पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल…
अपघातां मागची कारणे कोणती…
अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, चुकीच्या आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा ही अपघातामांगची प्रमुख कारणे आहेत. तर दृतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाडांचे टायर फुटणे ही अपघातां मागची प्रमुख कारणे आहेत. या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीनो ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर संथगतीने सुरु असणारे रुंदीकरण, बाह्यवळण मार्ग आणि दिशादर्शक फलकांचा आभाव, औद्योगिकरणामुळे अरुंद रस्त्यांवर वाढलेली अवजड वाहतुक हे देखील अपघांतामागचे प्रमुख कारण ठरत आहे.
महामार्ग अपघातातील आकडेवारी काय सांगते….
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०१६ ११५१ ३०१ ८७४
२०१७ १०१० २५७ ६६९
२०१८ १०९८ ३०२ ७३२
२०१९ ९९१ २१६ ६१३
२०२० ५९६ २०६ ४०९
२०२१ ६८८ २३६ ३७९
हेही वाचा : “संघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी…”, ठाकरे गटाचे सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर, म्हणाले…
“रस्ते अपघातांचे प्रमाणकमी व्हावे यासाठी दोन पातळ्यांवर आम्ही काम केले. एकीकडे बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई सूर ठेवली. तर दुसरीकडे वाहनचालकांमध्ये वाहतून नियमनाबाबत जनजागृती केली. यामुळे गेल्या वर्षभरात रस्ते अपघातांच प्रमाण कमी झाले आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ब्लॅक स्पॉट शोधून, त्यावर उपाययोजना करणे, ब्लिंकर्स बसवणे, गाडयांना रिफ्लेक्टर बसविणे, बाह्यवळण रस्त्याची पूर्व सुचना देणारे फलक लावणे यासारख्या उपाययोजना करत आहोत” – अनिल लाड , पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा रायगड