रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस मार्गावर असलेल्या अवघड वळणावर गुरुवारी सकाळी १० वाजता ट्रक दरीत कोसळून अपघात झाला आहे. चालकाने उडी मारल्याने जिवीत हानी टळली.
गुगल मॅपचा आधार घेत गोव्याहून वसईकडे पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन जाणारा ट्रक (एम एच ४८ जीबी २९३०) जात होता. तो फुणगुस येथील अवघड वळणावर आला असता चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने आणि ट्रक ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो किरकोळ जखमी झाला. अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत चालकाला दरीतून वरती काढले. या अपघाताची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्याला देण्यात येवून पोलिसांकडून घटनास्थळी जावून पंचनामा करण्यात आला.
फुणगुस या ठिकाणी सलग तिसरा अपघात गुगल मॅपमुळे झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तीन दिवसापूर्वीच केमिकल वहातूक करणारा टेम्पोला अपघात झाला होता.