रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यात राबविण्यात आलेल्या स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या हिमोग्लोबिन तपासणी मोहिमे मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील बहुतांशी विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. तालुक्यातील तब्बल ५० हजार विद्यार्थी आणि ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आल्यावर ७० टक्के पुरुष व ८० टक्के महिलांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी दीपिका रांबाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि स्वयंपूर्तता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिमोग्लोबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेनुसार भारतात ७० टक्के जनता अॅनिमियाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही गंभीर बाब लक्षात घेत श्रीमद रामचंद्र हॉस्पिटलने देशातील विविध जिल्ह्यांमध्ये हिमोग्लोबिन तपासणी व उपचार मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून संगमेश्वर तालुक्यातील तब्बल ५० हजार विद्यार्थी आणि ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये ७० टक्के पुरुष आणि तब्बल ८० टक्के महिलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे, असे दिपिका रांबाडे यांनी सांगितले.

हिमोग्लोबिन तपासणी या मोहिमेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची निवड करण्यात येवून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी स्वयंपूर्तता फाउंडेशनकडे सोपवण्यात आली आहे. या फाउंडेशनने पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्याची तपासणी पूर्ण केली असता या तपासणीमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळून आले आहे. अनेक शाळांमध्ये प्रार्थनेदरम्यान किंवा खेळताना विद्यार्थी अचानक चक्कर येऊन पडण्याचे प्रमाण वाढण्यामागे हिमोग्लोबिनची असलेली कमतरता हे कारण फाउंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तपासणीला विशेष प्राधान्य देण्यात येवून गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यालये, यात्रा, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी देखील ही तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून निश्चितच नागरिकांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधरुन अॅनिमियाग्रस्त लोकसंख्या कमी होईल, असा विश्वास दीपिका रांबाडे यांनी व्यक्त केला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील एकूण ५०,००० लोकांची तपासणी करण्यात आली होती. यातील २४ हजार ७३५ पुरुषांपेकी १७ हजार ३१४ म्हणजे ७०% पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन कमी आढळून आले आहे. तसेच २५ हजार १६५ महिलांची तपासणी करण्यात आल्यावर २० हजार १३२ म्हणजे ८०% महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. या आकडेवारीनुसार महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण पुरुषांपेक्षा १० टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या तपासणी मोहिमेत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळलेल्या प्रत्येकाला व विशेषतः विद्यार्थ्यांना, तीन महिन्यांसाठी औषधांचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर फाउंडेशन पुन्हा एकदा त्याच शाळा आणि गावांमध्ये पुनर्तपासणी मोहीम राबविणार असल्याचे रांबाडे यांनी सांगितले आहे. संगमेश्वर तालुक्यात ही मोहीम राबवण्यात आल्यावर आता संपुर्ण जिल्ह्यात देखील ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात हिमोग्लोबीन कमी असणा-या लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे.