सांगली : उन्हापासून दिलासा देणार्‍या बर्फ गोळ्याची विक्री करणार्‍या पर प्रांतीय विके्रत्याचा तीव्र उष्म्याने तडफडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सांगलीतील हिराबाग कॉर्नर येथे घडली. शिमगा अद्याप एक महिना दूर असतानाच जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून वैशाख वणव्याची आठवण करून देणारे तपमान आहे. सांगलीत उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून या रखरखत्या उन्हाचा त्रास झाल्याने हिराबाग कॉर्नर येथील वॉटर हाऊस जवळ बर्फाचे गोळे विकणार्‍या एका व्यक्तीचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला. रामपाल खेलायन असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रारंभी तो रस्त्यावर कोसळला आणि त्याला तात्काळ रक्ताच्या उलट्या झाल्या. यामुळे खून झाल्याची अफवा पसरली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तीव्र उष्म्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. मात्र अधिक तपासणीसाठी पार्थिव जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसापासून दिवसेंदिवस किमान आणि कमाल तपमानात वाढ होत आहे. सोमवारी सांगलीतील किमान तपमान १८ अंश सेल्सियस तर कमाल तपमान ३५ अंश सेल्सियस होते. हवेतील आर्द्रता १८ टक्के असून पुर्वेकडून वाहणार्‍या वार्‍याचा वेग ताशी १५.८ प्रति किलोमीटर होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिमग्या दिवशी म्हणजेच होळी पौर्णिमेला थंडी जाते आणि त्यानंतर उन्हाचा हंगाम सुरू होतो. तसेच शिवरात्री एकादशीनंतर उन्हाची तीव्रता वाढत जाउन वैशाख महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता अधिक असते असे मानले जाते. मात्र, या वर्षी पंधरा दिवस अगोदरच उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम होउ लागला आहे. उन्हाच्या तीव्रतेने शीत पेये, उसाचे रसवंती गृह, ताक, मठ्ठा, सरबत यांची विक्री करणारे हातगाडेही अधिक प्रमाणात रस्त्यावर दिसू लागले आहेत. उन्हाच्या रखापासून बचाव करण्यासाठी नागरिकही शीतपेयासाठी गर्दी करू लागले आहेत.