सातारा: सातारा शहरात गुरुवार पेठेत काळा दगड येथे एका ‘सर्व्हिसिंग सेंटर’मधील कॉम्प्रेसर फुटून झालेल्या भीषण स्फोटात एक जण जळून जागीच ठार तर दोन जण भाजल्याने गंभीर जखमी झाले. मुजमील हमीद पालकर (गुरुवार परज, सातारा) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हरून बागवान व उमर बागवान हे दोघे या स्फोटामध्ये जखमी झाले असून त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या नियोजनात दुपारी सर्व यंत्रणा असताना गुरुवार (माची) पेठेत काळा दगड येथे एका छोट्या दुकानात अचानक झालेल्या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला. आजूबाजूच्या घरांना तडे गेले. घरांच्या काचा फुटल्या. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. काय झाले हे कोणालाही कळत नव्हते. स्फोट झालेल्या परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. अधिक चौकशी करता दुकानातील कॉम्प्रेसरचे शॉर्ट सर्किट झाल्याने स्फोट झाल्याचे उघड झाले.

हेही वाचा : उजनीतून दोन महिन्यांत सोडले १०६ टीएमसी पाणी, नीचांकी पातळीवरील उजनीत १२२.३६ टीएमसी पाणीसाठा

शाहू चौक ते बोगदा मार्गावर पालकर यांचे चिकन शॉप आणि बाजूला सर्व्हिसिंग सेंटर आहे. तेथे हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की चिकन व्यावसायिक पालकर सुमारे दहा फूट हवेत फेकले जाऊन रस्त्यावर आदळले. या स्फोटात भाजून गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर हरून बागवान व उमर बागवान हे दोघे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा : सातारा: खटाव तालुक्यात ज्येष्ठाचा चिमुरडीवर अत्याचार, घटनेने संताप; आरोपीला कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्फोटाची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संरक्षक भिंत उभी करून परिसर बंद केला. स्फोट झालेल्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या व जखमींची चौकशी केली.