सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत (रि अलाइनमेंट) बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाणार असून, प्रकल्पाचा खर्चही कमी होणार आहे.

आमदार केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुधारित आखणीमुळे इको-सेन्सिटिव्ह (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील) आणि बागायतीच्या भागातून जाणारा महामार्ग टाळता येणार आहे. त्याऐवजी, आता केसरी-फणसवडे मार्गाचा वापर केला जाईल. यामुळे आंबोली येथील तब्बल ३० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्याची गरज टळणार असून, केवळ १० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून महामार्ग मळगावला जोडणे शक्य होईल. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात लक्षणीय घट होणार असून, पर्यावरणाची हानी देखील टळेल असे केसरकर यांनी नमूद केले.

याव्यतिरिक्त, या सुधारित मार्गामुळे रेडी-रेवस आणि रेडी बंदराशी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी (जोडणी) मिळणार आहे. यामुळे कोकणातील स्थानिक उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करणे शक्य होईल. आमदार केसरकर यांच्या मते, यामुळे कोकणातील शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केसरकर यांनी सांगितले की, शक्तिपीठ महामार्गाच्या या सुधारित आखणीमुळे कोकणच्या विकासाला गती मिळेल. तसेच, जैवविविधता संवेदनशील परिसरातील वन्य प्राण्यांची सुरक्षितता राखली जाईल. सध्याचा नागपूर-दिल्ली कनेक्टिव्हिटी पाहता, या नव्या मार्गामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल. थेट गोव्याला जोडल्यास पर्यावरण, शेतकरी, बागायतदार, बांदा बाजारपेठे आणि वन्यप्राणी असे अनेक प्रश्न निर्माण होतील. याउलट, केसरी-फणसवडे ते मळगाव असा मार्ग नेल्यास तो मुंबई-गोवा महामार्ग, रेडी-रेवस सागरी महामार्ग आणि रेडी बंदराला जोडला जाईल. यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक भरपाईसाठीही होईल, असे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सांगून, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल अशी अपेक्षा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.