राहाता: शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-परदेशातून येणारे साईभक्त मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात. या देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांत वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास संस्थानच्या तदर्थ समितीने मान्यता दिली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
साईबाबा संस्थानचे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा-सुविधा, विशेषतः दर्शन-आरती सुविधा, बहुमान म्हणून शाल व फोटो, साई चरित्र, उदी- लाडू प्रसाद, भोजन पास इ. दिले जाणार आहेत. या धोरणातून साईभक्तांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या कुटुंबातील सदस्यांचाही योग्य सन्मान केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सुधारित सेवा-सुविधा पुढीलप्रमाणे- १० ते २५ हजारांपर्यंतचे दान देणाऱ्या साईभक्तास एका वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती पास, २५ ते ५० हजारांपर्यंतचे दान देणाऱ्यास दोन वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती व दर्शन पास, ५० हजार ते १ लाखापर्यंतचे दान देणाऱ्यास दान करतेवेळी कुटुंबातील ५ सदस्यांसाठी दोन व्हीआयपी आरती पास.रु. १ लाखावर दान देणाऱ्यास वर्षामध्ये २ व्हीआयपी आरती पास, तसेच नंतरच्या वर्षात त्यांच्या दानाप्रमाणे प्रति वर्ष १ व्हीआयपी आरती पास मिळेल. त्या वेळी सशुल्क दर्शन रांगेतून कुटुंबाच्या ५ सदस्यांसाठी तहहयात वर्षातुन १ वेळेस मोफत दर्शन सुविधा देऊन सन्मान केला जाईल. १० ते ५० लाखपर्यंत दान देणाऱ्यास देणगी प्रमाणात प्रत्येक वर्षी २ व्हीआयपी आरती पास व त्यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांना तहहयात वर्षातून एक वेळेस मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल. वर्षात एकवेळेस श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्यास वस्त्र देण्याची संधी दिली जाणार आहे.
रु. ५० लाख आणि त्याहून अधिकचे दान देणाऱ्या साईभक्तास तहहयात ५ सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष ३ व्हीव्हीआयपी आरती पास मिळणार आहेत. या देणगीदार साईभक्तासह कुटुंबातील ५ सदस्यांना प्रत्येक वर्षी २ प्रोटोकॉल व्हीव्हीआयपी दर्शन पास मिळतील. या सर्व देणगीदारांचा संस्थान यथोचित सन्मान करणार आहे.
सुविधेसाठी संगणक प्रणाली
सुधारित देणगी धोरणाच्या अनुषंगाने देणगीदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञान (सॉफ्टवेअर) विकसित करण्याचे काम झाल्यानंतर देणगीदारांची सर्व माहिती त्यामध्ये भरली जाईल. त्यानुसार प्रत्येक देणगीदाराला स्वतंत्र कार्ड दिल्यानंतर त्याआधारे त्यांना या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर त्याची माहिती मिळेल. देणगीदारांनी शिर्डीला येण्याअगोदर १ महिना संस्थानला कळविल्यास त्यांना या सुविधेचा फायदा देण्यास संस्थान प्रशासन तत्पर असेल. या नवीन देणगी धोरणाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. – गोरक्ष गाडिलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी