सोलापूर : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) अचूक वापर करून सोलापुरात एकाच दिवशी हृदयरोगावरील गुंतागुंतीच्या तीन शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. भैय्या चौकात एसीएस हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शस्त्रक्रिया हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसकिरणसिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी एआय वापरून सोलापुरात प्रथमच या शस्त्रक्रिया केल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटिल आणि अवघड समजल्या जाणाऱ्या आयव्हस, रोटा आब्लेशन बायफरगेशन एन्जोप्लास्टी, इट्राव्हॅस्क्युलर लिथो ट्रिप्सी, अल्ट्रा लो कॉन्ट्रास्ट इत्यादी पद्धतीचा वापर करताना त्यात एआयचा वापर करून शस्त्रक्रियेचे निदान केल्यास त्यातील अचूकता वाढते, हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे.

पुण्यातील एका रुग्णाची एक वर्षापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुढील सहा महिन्यांतच त्याची रक्तवाहिनी बंद पडली. तसेच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ॲन्जोप्लास्टीही करण्यात आली होती. मात्र, तरीही त्या रुग्णाचा त्रास कमी न झाल्यामुळे रुग्ण सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. या रुग्णावर तीन तास गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया पार पडली. तसेच सोलापूर आणि शेजारच्या धाराशिवमधील प्रत्येकी एका रुग्णावरील शस्त्रक्रियेचे निदानही एआयद्वारे करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही रुग्णांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या ठिकाणी दुभागत होत्या, त्या ठिकाणी बायफर्गेशन ही अत्याधुनिक पद्धती वापरून दोन्ही रक्तवाहिन्यातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला. दोन्ही शस्त्रक्रिया प्रत्येकी दीड तास चालल्या. उपचारनंतर तिन्ही रुग्णांना गुरुवारी घरी पाठविण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसकिरणसिंग दुग्गल हे जागतिक कीर्तीचे असून, मुंबईच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर प्रमोद पवार यांनी चेन्नईच्या मद्रास मेडिकल मिशन हॉस्पिटल आणि कोची येथील लिसी हॉस्पिटलमध्ये रोटा अब्लेशन आणि आयव्हसचे तांत्रिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण घेतले आहे.