सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. डॉ. जयश्री प्रशांत गवळी (वय ३८) असे तिचे नाव आहे. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. अलिकडेच सांगोला येथे डॉक्टर पतीसह उद्योगपती सासरा व सासूकडून झालेल्या छळाला वैतागून डॉ. ऋचा रूपनवर यांनी आत्महत्या केली होती. त्यास महिनाही उलटत नाही तोच, मोहोळजवळ अन्य दुस-या डॉक्टर महिलेने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.

हेही वाचा : सांगली: नूतन खासदारांकडून आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती

पेशाने डॉक्टर आसलेले जयश्री गवळी आणि त्यांचे पती प्रशांत गवळी दोघेही मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेनूर गावात गवळी हाॕस्पिटल या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत होते. त्यांना तीन अपत्ये आहेत. दुपारी घरात डॉ. जयश्री यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तात्काळ पंढरपूरच्या एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत. डॉ. जयश्री गवळी या महाराष्ट्र राज्य माळी महासंघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक शंकरराव लिंगे यांच्या कन्या होत.