सोलापूर: मागील दोन महिन्यांपासून तापत चाललेल्या सोलापुरात आज गुरुवारी तापमानाचा पारा ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला. सोलापूरच्या यंदाच्या उन्हाळ्यातील हे तापमान उच्चांकी ठरले आहे. गेल्या एप्रिलमध्ये ३० पैकी तब्बल २५ दिवस तापमान ४० ते ४३ अंशांच्या पुढेच राहिले होते. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला तापमानाने उच्चांक गाठल्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांची अस्वस्थता आणखी वाढली आहे. सोलापूर आता ‘ शोलापूर ‘ बनत चालले आहे.‌

यंदा सोलापुरात उन्हाळा होळीच्या अगोदरपासूनच सुरू झाला होता‌. मार्च महिन्यात तापमानाने तोंड वर काढायला सुरुवात केली असता १३ मार्च रोजी पहिल्यांदाच तापमान ४०.६ अशांवर गेले होते.‌ त्या महिन्यात ११ दिवस तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढेच राहिला होता. त्यातून उष्णतेची झळ सतावत गेली. मागील एप्रिल महिन्यात तापमानात वरचेवर वाढत होत होती.‌ चाळिशी पार केलेल्या तापमानाची सवय झाली असताना त्यात पुन्हा पुन्हा वाढ झाल्याने उष्मा असह्य ठरू लागला. उष्म्याची छळ बसू लागल्यामुळे दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्यावरील वर्दळ घटत गेली. संपूर्ण महिन्यातील ३० पैकी तब्बल २५ दिवस तापमान किमान ४० अंश ते ४३.८ अंशांपर्यंत मोजण्यात आले.

१ एप्रिल रोजी ४०.१ अंश तापमान नोंद झाल्यानंतर पुढे चार दिवसांचा अपवाद वगळता पुन्हा तापमानाने डोके वर काढले. पुढे ४२ अंश तापमान ओलांडून ४३ पार केलेला पारा २३ एप्रिल रोजी ४३.८ अंश म्हणजे ४४ अंशांच्या घरात गेला होता. काल महिनाअखेर, ३० एप्रिल रोजी तापमान ४३.६ अंशांवर होते. संपूर्ण एप्रिल महिन्यात वाढत्या उष्म्याने अंगाची लाही लाही झाली असताना पुढे मे महिन्याची सुरुवातही सोलापूर आणखी तप्त होण्याने झाली. ४४.१ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान मोजण्यात आल्यामुळे मे महिना ‘अस्वस्थ वर्तमान’ घेऊन आल्यासारखे सोलापूरकरांना वाटत आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने तात्पुरता दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा तापमानाचा पारा पुढचा टप्पा गाठू लागल्यामुळे वैशाखी वणव्याचे अस्तित्व त्रासदायक ठरू लागले आहे. गरम, उष्ण झळा, कोरडी हवा सकाळपासूनच जाणवत असून रात्री क्वचितच थंड वा-याची झुळूक येते. वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी शीतपेये, पाणीदार फळांचा वापर वाढला आहे. घरात, कार्यालयात विद्युत पंखेही कुचकामी ठरत असून कूलर, एअर कंडिशनर इत्यादी उपकरणांना मागणी वाढली आहे. फ्रीजचा वापर तेवढ्याच जास्त प्रमाणात वाढला आहे.‌ सायंकाळनंतर फेरफटका मारण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसून येतात.‌