मोहनीराज लहाडे

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत नगर लोकसभा मतदारसंघातील नीलेश लंके यांचा समावेश करण्यात आला आहे. लंके यांनी काल, शुक्रवारी सायंकाळी आमदार पदाचा राजीनामा देऊन पवार गटाकडून उमेदवारी करण्याचे जाहीर केले आणि लगोलग दुसऱ्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर होणे हा केवळ योगायोग आहे की पवार-लंके यांनी ठरवून केलेली खेळी, याबद्दल आता जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा नगर जिल्ह्यातील लंके व डॉ. किरण लहामटे हे दोन्ही आमदार सुरुवातीला शरद पवार गटात सहभागी झाले होते. मात्र काही दिवसांतच दोघेही महायुतीत सहभागी झालेल्या अजितदादा गटाकडे आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर मतदारसंघात विकासकामांसाठी भरघोस निधी दिल्याचा गवगवाही लंके यांनी वेळोवेळी केलेला आहे.

हेही वाचा >>>“मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव आमदार”, हर्षवर्धन जाधव लढवणार लोकसभा निवडणूक; पण कोणत्या पक्षातून?

पक्ष फुटीनंतरच्या न्यायालयीन लढाईतून शरद पवार यांचे छायाचित्र वापराबाबत वेळोवेळी अजितदादा गटाला इशारा दिला गेला होता. त्यामुळे अजितदादा गटाने पवार यांच्या छायाचित्रांचा वापर बंद केला. त्यानंतरही नीलेश लंके यांच्याकडून शरद पवार यांच्या नावाचा व छायाचित्राचा वापर सुरूच होता. परंतु शरद पवार गटाच्या नगर जिल्ह्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याने त्याबद्दल कोणतीच हरकत घेतली नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दोन्ही निवडणुकांच्या आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेतला तर आमदार पदाचा कार्यकाल अवघ्या दोन-तीन महिन्यांचा शिल्लक राहतो. ही अल्पकाळाची परिस्थिती लक्षात घेत नीलेश लंके यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. समर्थकांच्या मेळाव्यात लंके यांनी स्वत:च, आपण नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करू, असा शरद पवारांना शब्द दिल्याचे जाहीर केले. याच घडामोडीत त्यांनी पुण्यात जाऊन पवार यांची दोन-तीन वेळा भेटही घेतली. त्यामुळेच ते शरद पवार गटात केव्हा सहभागी होतात, याची केवळ औपचारिकताच बाकी होती.

हेही वाचा >>>साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू

राज्यात महायुतीच्या सत्तेचा लाभ घेतल्यानंतर त्यांनी आमदार पदाचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांची उमेदवारीही पहिल्याच यादीत शरद पवार यांनी जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लंके यांना उमेदवारी न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत लंके शरद पवार गटात प्रवेश करते झाले. लंके कोणत्याही परिस्थितीत अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणार असेच गेल्या काही दिवसांपासून वातावरण निर्माण झाले होते.

हा सर्व घटनाक्रम लक्षात घेतला तर नीलेश लंके यांनी राजीनामा देणे व लगोलग त्यांची उमेदवारी जाहीर होणे हा केवळ योगायोग होता की पवार-लंके यांनी ठरवून केलेली खेळी याबद्दल जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आता चर्चा होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीलेश लंके यांनी चुकीचा निर्णय घेतला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच वर्षे पूर्ण ताकद दिली. भविष्यातही ताकद दिली जाणार होती. परंतु आता त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, त्याच्या यश-अपयशाला तेच जबाबदार राहतील. –बाळासाहेब नाहाटा, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)