निसर्गसंपदा व जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटाचा देशातील सर्व राजकीय मंडळी विकासाच्या नावाखाली विनाश करीत असल्याचा आरोप गांधीवादी व पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र यांनी महाबळेश्वर येथील पश्चिम घाट बचाव परिषदेच्या उद्घाटन समारंभात केला. या वेळी पश्चिम घाट बचाव आंदोलनातील अनेक संघटनांचे प्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, केरळ व तामिळनाडू या पाच राज्यांत पसरलेल्या पश्चिम घाटाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या अनेक संघटनांची पश्चिम घाट बचाव ही एक संघटना असून या संघटनेची परिषद अप्लाइड इन्व्हायर्न्मेंटल रीसर्च फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली असून या तीनदिवसीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात मिश्र बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर की स्टोन फाऊंडेशनच्या प्रतिम रॉय, ए. ई. आर. फाऊंडेशनच्या अर्चना गोडबोले आदी उपस्थित होते.
पश्चिम घाटात उपलब्ध असलेली जैवविविधता लक्षात घेऊन उशिरा का होईना ‘युनोस्को’ने याची दखल घेतली आहे. या पर्वतरांगेला जागतिक वारसा दर्जा देऊन त्याचे जतन करण्याचे आवाहनही ‘युनोस्को’ने केले आहे; परंतु या जागतिक वारशाचे आपण खरंच जतन करतो का, हा प्रश्न आहे. जागतिक वारशाचे जतन करण्यासाठी आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. विकासाच्या नावाखाली या भागाचा विनाश करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत चढाओढ लागली आहे. विकास हा झालाच पाहिजे, परंतु पर्यावरणाचा सर्वनाश करून हा विकास नको आहे. या पश्चिम घाटात अनेक प्रकल्प येत आहेत. याच प्रकल्पामुळे पश्चिम घाटाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
पर्यावरणासाठी आपण कायदे करतो, त्याचे आपण तंतोतंत पालन करीत नाही, कारण कायदे करताना आपण पळवाटाही शोधत असतो; परंतु या जंगलात असलेले आदिवासी या जंगलासाठी कोणतेही लेखी कायदे न करताही या पश्चिम घाटाचे आपल्यापेक्षाही चांगले रक्षण करीत असतात. जंगलरक्षणासाठी असलेले त्यांचे अलिखित नियम हे पिढय़ान् पिढय़ा चालत आलेले आहेत; परंतु विकासाच्या नावाखाली येत असलेल्या प्रकल्पामुळे आदिवासींचे जीवनही धोक्यात आले आहे, असेही मिश्र म्हणाले. पश्चिम घाट बचाव मोहिमेला पंचवीस वर्षे झाली; परंतु पंधरा हजार कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या पश्चिम घाटाच्या रक्षणासाठी पंचवीस वर्षे ही कमीच आहेत.
आपण हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी आपल्या पुढील पिढीला हे आंदोलन असेच चालू ठेवावे लागेल, असे सांगून मिश्र म्हणाले, की पाच राज्यांतील वेगवेगळ्या संघटनांनी पश्चिम घाट बचावसाठी एकत्र आले पाहिजे. आपल्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे. तसेच सर्वानी नेहमी संपर्कात राहायला पाहिजे व हे आंदोलन यशस्वी होईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी पश्चिम घाट बचाव या मोहिमेवर आधारित जगदीश गोडबोले लिखित व आल्हाद गोडबोले संपादित पुस्तकाचे प्रकाशनही अनुपम मिश्र यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्नेहलता भट यांनी केले. या परिषदेला सायलेंट व्हॅलीचे मुख्य एम. के. प्रसाद, पश्चिम घाट बचाव माहिमेचे प्रवर्तक व्ही. बी. माथुर, सोमनाथ सेन, गणेश देवी, माधव गोडबोले, जय सामंत, शशी पटवर्धन, अरुण भाटिया आदी पर्यावरणप्रेमी व पश्चिम घाट बचाव आंदोलनातील अग्रणी तसेच भीमाशंकर परिसरासह कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतील आदिवासी या परिषदेला उपस्थित राहिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
विकासाच्या नावाखाली पश्चिम घाटाचा विनाश
निसर्गसंपदा व जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटाचा देशातील सर्व राजकीय मंडळी विकासाच्या नावाखाली विनाश करीत असल्याचा आरोप गांधीवादी व पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र यांनी महाबळेश्वर येथील पश्चिम घाट बचाव परिषदेच्या उद्घाटन समारंभात केला.

First published on: 01-12-2012 at 04:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the name of development of western ghat in fact destroying it