सावंतवाडी : स्वच्छ सर्वेक्षणात वेंगुर्ले नगरपरिषदेने पुन्हा एकदा आपली स्वच्छता आणि कार्यक्षमतेची नोंद घेतली आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने शहरांच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यात तिसरा आणि देशात १५वा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्येही वेंगुर्लेला १४वा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय, वेंगुर्ले शहराला “जीएफसी १ स्टार” मानांकन मिळाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वच्छतेसाठी अथक प्रयत्न आणि प्रभावी अंमलबजावणी: नगरपरिषदेने स्वच्छतेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे स्पष्ट होते. वेंगुर्ले नगरपरिषदेची स्वच्छता मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे.

शंभर टक्के कचरा विलगीकरण आणि वर्गीकरण: प्रत्येक घरातून १०० टक्के विलगीकृत कचरा संकलित केला जातो. या कचऱ्याचे नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे तब्बल २७ प्रकारात वर्गीकरण केले जाते.

कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापर: संकलित ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायोगॅस आणि जैविक खत तयार केले जाते. तर, सुक्या कचऱ्याचे उपयोगानुसार वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते, ज्यामुळे कचरा व्यवस्थापनातून महसूलही मिळतो.

नियमित स्वच्छता: शहरातील बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांची नियमित स्वच्छता केली जाते. सार्वजनिक शौचालयांची देखभाल-दुरुस्ती करून ती स्वच्छ ठेवली जातात. गटारे आणि व्हाळी यांचीही नियमितपणे स्वच्छता होते.सांडपाणी आणि मैलापाणी व्यवस्थापन: सांडपाणी आणि मैलापाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले जाते, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाहीत.जनजागृती आणि लोकसहभाग स्वच्छ सर्वेक्षण कालावधीत वेंगुर्ला नगरपरिषदेने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.

प्लॅस्टिक निर्मूलन अभियान: प्लास्टिक निर्मूलन पथक स्थापन करून सिंगल-यूज प्लॅस्टिक वापरणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. व्यापक जनजागृती: प्लॅस्टिक बंदीबाबत माहिती फलक, भिंतीचित्रे आणि पथनाट्यांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली.

स्वच्छता मोहिमा आणि स्पर्धा: शहरातील विविध ठिकाणी नियमित स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छताविषयक स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवली गेली.नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध पदाधिकारी आणि नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागातून अनेक ठिकाणी साफसफाई मोहीम राबवली गेली. दर महिन्याला मांडवी येथे कांदळवन स्वच्छता अभियानही राबवण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांचे आभार

मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी या यशाचे श्रेय वर्षभरात आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमा, जनजागृतीपर कार्यक्रम आणि स्वच्छताप्रेमी वेंगुर्लावासियांच्या उत्स्फूर्त सहभागाला दिले आहे.